जिल्ह्यातून ४९ आरोपी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 09:56 PM2019-09-03T21:56:05+5:302019-09-03T21:56:19+5:30
जळगाव : गणेशोत्सव, मोहरम, निवडणुका व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी ठरलेल्या जिल्ह्यातील ४९ जणांना जिल्ह्यातून एक व दोन वर्षासाठी ...
जळगाव : गणेशोत्सव, मोहरम, निवडणुका व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी ठरलेल्या जिल्ह्यातील ४९ जणांना जिल्ह्यातून एक व दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात हद्दपार केलेल्यांची संख्या १८ असून, आणखी ७१ प्रस्तावांवर काम सुरू आहे, लवकरच हे आरोपीदेखील हद्दपार केले जातील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या निष्पन्न करण्यात आल्या असून, या टोळ्यांना आर्थिक पाठबळ पुरविणारे व पडद्यामागून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या लोकांवरही पोलिसांची नजर आहे. या टोळ्यांना हद्दपार करण्यासह त्यांच्या म्होरक्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ.उगले म्हणाले. सोशल मीडियावर जाती-धर्माच्या भावना दुखावणारे मजकूर प्रसारित होत असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. अफवा किंवा तेढ पसरविणाºया व्यक्तीवर सायबर गुन्ह्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. असा मजकूर, फोटो, व्हिडीओ क्लीप, प्रसारीत व लाईक करणारा गुन्ह्यास पात्र ठरणार आहे.
डी.जे.ची सात वाहने ताब्यात
डी.जे.ला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही काही जण वाहनांमध्ये फेरफार करून डी.जे.चा वापर करीत असल्याचे निदर्शनास आलेल्या ७ वाहनांवर भुसावळ येथे कारवाई करण्यात आली. ही वाहने आरटीओच्या ताब्यात देण्यात आली आहेत. डी.जे.वापर व ध्वनी प्रदूषण होत असल्यास नागरिकांनी नजिकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.