लोहारा परिसरात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:29+5:302021-08-14T04:19:29+5:30
लोहारा, ता. पाचोरा : मृग नक्षत्राच्या शेवटी शेवटी झालेल्या पावसावर परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, मात्र पेरणीनंतर ...
लोहारा, ता. पाचोरा : मृग नक्षत्राच्या शेवटी शेवटी झालेल्या पावसावर परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, मात्र पेरणीनंतर अधून-मधून होणाऱ्या रिमझिम पावसामुळे या भागातील पिके कशीतरी तग धरून आहेत. परिसरात जोरदार पाऊस झालेला नसल्याने आता पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पाऊस जरी लांबला तरी लांबून-लांबून किती लांबेल, जुलैच्या सुरुवातीला तर नक्कीच येईल या आशेवर आपल्या विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्याच्या भरवशावर या भागातील शेतकऱ्यांनी ठिबकचा कापूस लागवड केलेला आहे. मात्र आता विहिरीतील पाणी संपत आल्याने शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत. यापुढे जोरदार पाऊस झाला तरच या भागातील पीकस्थिती सुधारेल, अन्यथा भविष्यात उत्पन्नात घट होऊन पीकस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
पावसाअभावी या भागातील कापसाच्या पिकाबरोबरच मिरची व कारले या भाजीपालावर्गीय पिकांनादेखील किडींनी प्रभावित केलेले दिसून येत आहे. कारल्याचे वेल पिवळे होऊन सुकत आहेत, तर मिरचीवर घुबड्या रोग दिसून येत असल्याने शेतकरी कमालीचा चिंतातुर दिसून येत आहे.