एरंडोल तालुक्यात विद्येच्या मंदिराला थकबाकीचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:17 PM2017-12-12T15:17:55+5:302017-12-12T15:24:06+5:30
वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने एरंडोल तालुक्यातील १४ जि.प. शाळा अंधारात
आॅनलाईन लोकमत
एरंडोल,दि.१२ : ज्ञानदानाचे कार्य करून अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाºया एरंडोल तालुक्यातील १४ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
एरंडोल तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळांची संख्या ८४ असून पैकी १४ शाळांमध्ये वीज जोडणी नसल्यामुळे अजूनही काळोख आहे. शैक्षणिक क्षेत्रात ‘अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे’ अशी ब्रीद वाक्ये प्रचलित आहेत. मात्र या शाळांमध्ये याउलट चित्र आहे.
एरंडोल तालुक्यात जि.प.च्या ४२ शाळांकडे १ लाख ८९ हजार ३२० रुपयांचे वीज बिल थकीत आहे. शासनाकडून शाळांना अत्यल्प अनुदान मिळते. त्यातून वीज बिल भरणे शक्य होत नाही. विशेष हे की, या शाळांना घरगुती वापराचे बिल देण्याऐवजी व्यावसायिक वापर केल्याची वीज बिले देण्यात येतात. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत आहे. थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
एकीकडे शासन डिजिटल शाळा करण्याचा मोठा गाजावाजा करीत आहे. डिजिटल शाळा करण्यासाठी आवश्यक असलेली वीजपुरवठ्याची समस्या दूर केली जात नाही.
त्यामुळे या योजनेस गालबोट लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शाळांकडे प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, टॅब इत्यादी वस्तू आहेत, त्या वीजपुरवठ्याअभावी शोभेच्या वस्तू ठरत आहेत. शासनाने शाळांना घरगुती वापराची बिले द्यावी व शाळांना देण्यात येणाºया अनुदानात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.