१५ हजारांवर बाधितांची भीती दूर करीत दिला भावनिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:59+5:302021-05-31T04:13:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना झाला म्हणजे आता सर्व संपले, अशी मनात भीती निर्माण झाली असताना व अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना झाला म्हणजे आता सर्व संपले, अशी मनात भीती निर्माण झाली असताना व अनेक रुग्णांचे नातेवाईकदेखील देखभाल करीत नसताना जिल्हाभरातील १५ हजार ६७७ कोरोना बाधित रुग्णांसाठी वाॅर रूम मोठा आधार ठरली आहे. या वाॅर रूमच्या माध्यमातून संपर्क साधत रुग्णांच्या मनातील भीती दूर करून भावनिक आधार देण्यात आला.
कोरोनामुळे उद्भवलेली ही स्थिती पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढून रुग्णांचे मनोधैर्य वाढीसाठी व आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी वाॅर रूम स्थापन करण्यात यावी व प्रत्येक रुग्णाशी संपर्क साधत त्यांचे मनोबल वाढवावे, अशा सूचना दिल्या. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातच जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाॅर रुम स्थापन करण्यात आली.
रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासह आरोग्यविषयक मार्गदर्शन
रुग्णांना आधार देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वॉर रूममध्ये शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या समग्र शिक्षा अभियानातील जिल्हा समन्वयक व विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. हे कर्मचारी जिल्ह्यातील बाधित रुग्णांशी संपर्क करीत त्यांना येणाऱ्या अडचणी व आरोग्यविषयक समस्या याबाबत माहिती घेऊन सदर रुग्णांना जिल्हा प्रशासनामार्फत चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. या वॉर रूममार्फत आतापर्यंत १५ हजार ६७७ रुग्णांशी संपर्क साधण्यात आला.
ग्रामीण भागातील रुग्णांनाही आधार
गेल्यावर्षी कोरोना संसर्ग वाढला. त्यावेळी शहरी भागात त्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, यावेळी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येऊ लागले. त्यात ग्रामीण भागातील एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी पडल्यास ते स्थानिक पातळीवरच उपचार घेऊन आजार अंगावर काढण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे संसर्ग वाढू लागला. यात कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असल्याचे अनुभवदेखील आले व अधिकच भीती वाढू लागली. अशा या गंभीर काळात ग्रामीण भागातील रुग्णांशीदेखील वॉर रूमच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांचे मनोबल वाढविण्यासह आजूबाजूला देखील कोणी आजारी असल्यास त्यांना तत्काळ उपचार घेण्याविषयी आवाहन करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील संसर्ग नियंत्रणात येण्यास मदत होऊ लागली. अनेकांच्या मनातील भीती यामुळे दूर झाल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत वाॅर रूममधील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. वाररूमचे काम दत्तूसिंग पाटील, चेतन निकम, सुरेश सोनवणे, अरुण संदांशिव, दत्तात्रय पवार, पद्माकर पाटील, अनिल पाटील, नितीन पाटील या कर्मचाऱ्यांनी सांभाळले.