जळगाव जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक बियर बार बंद
By Admin | Published: April 4, 2017 12:14 PM2017-04-04T12:14:54+5:302017-04-04T12:14:54+5:30
जळगाव शहरातील 100 पेक्षा अधिक तर जिल्हाभरात मिळून जवळपास 700 पेक्षा अधिक बियर बार व दारूची दुकाने बंद आहे
जळगाव, दि.4- महामार्ग, राज्यमार्गालगत 500 मीटर आत अंतरातील बियर बार, दारूची दुकाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने जळगाव शहरातील 100 पेक्षा अधिक तर जिल्हाभरात मिळून जवळपास 700 पेक्षा अधिक बियर बार व दारूची दुकाने बंद असल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात सध्या किती बियर बार सुरू आहेत, न्यायालयाच्या आदेशाने किती बियर बार बंद होतील व किती सुरू राहतील याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती मागितली, पण ही माहितीच अजून तयार नाही. शासनाचे यासंदर्भातील कोणतेही नवीन आदेश, सूचना आलेल्या नसल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एस.एल.आढाव यांनी दिली.
नव्या नियमासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागही संभ्रमात आहे, त्याची अंमलबजावणी सुरू कशी करावी, काय प्रक्रिया राबवावी, असा गोंधळ उत्पादन शुल्क विभागात आहे. यामुळे दारू व बियर बार परवान्यांचे नूतनीकरणही सोमवारी झाले नाही. त्यामुळे अनेक बियर बार चालक, दारू दुकानांचे संचालक उत्पादन शुल्क कार्यालयात सायंकाळर्पयत थांबून होते. काही आदेश आले का?, नवीन सूचना आल्या का?, याची प्रतीक्षा या सर्वाना होती.
महापालिका हद्दीमधील रस्ते राज्यमार्ग नको
महापालिका किंवा पालिका हद्दीमधील रस्ते राज्यमार्ग असायला नकोत. अनेक रस्ते पालिकने अनेक वर्षापूर्वी ताब्यात घेतले, पण ते अजूनही राज्य मार्ग म्हणूनच कागदोपत्री आहेत, असा दावा बार असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे.
शहरात फक्त सहा बियर बार सुरू
शहरात फक्त सहा बियर बार सुरू होते. सोमवारी या बियर बारवर मोठी गर्दी झाली. ग्रामीण भागातील बियर बार, दारू दुकानेही बंद असल्याने शहरात दारू घेण्यासाठी अनेक जण आले. भजे गल्ली व परिसरात मोठी गर्दी झाली. वाहतुकीची मोठी कोंडी या भागात होताना दिसून आली.
राज्यमार्ग, महामार्गलगतचे किती बियर बार बंद होतील, किती सुरू राहतील याची आकडेवारी अजून नाही. नवे आदेशही याबाबत शासनाने दिलेले नाहीत.
-एस.एल.आढावा, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक
जिल्हाधिकारी यांची बार असोसिएशनने भेट घेऊन महापालिका हद्दीमधील रस्ते राज्यमार्ग म्हणून न ठेवता त्यांना पालिकेच्या हद्दीत घेतले जावे, अशी मागणी केली आहे. लातूर येथे सोमवारी बियर बार सुरू झाले. या निर्णयाबाबत काय भूमिका घ्यायची ते लवकरच ठरवू.
-भागवत भंगाळे, अध्यक्ष, बार असोसिएशन