जिल्ह्यात पाच लाखांवर लोकांना मिळाले मोफत धान्य; पुढे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:13+5:302020-12-15T04:33:13+5:30
जळगाव : कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. ...
जळगाव : कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ५ लाख १३ हजार १५० जणांना गहू, तांदळाचे वाटप करण्यात आले. मात्र नोव्हेंबरपर्यंतच हे वाटप झाले असले तरी यानंतर पुढे काय, अशी चिंता हाताला काम नसलेल्यांना लागली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. यामध्ये सर्वच व्यवहार, उद्योग बंद असल्याने अनेकांच्या हातचे काम गेले. इतकेच नव्हे चहा, खाद्यपदार्थ विक्रेते, पानटपरी चालत यांचेही उदरनिर्वाहाचे साधन बंद झाल्याने त्याच्यासमोर संकट उभे राहिले. अशावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू करण्यात येऊन यामध्ये सुरुवातीला एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या काळात पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आले. त्यानंतर जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंत तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्यात आले. नोव्हेंबरपर्यंत तर हे धान्य मिळाले, मात्र आता डिसेंबरपासून धान्य मिळणे बंद झाले आहे. अजूनही हाताला काम नसल्याने चिंता वाढली आहे.
व्यवसाय बंदच, आता पोट कसे भरणार?
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्यापही पाहिजे तसे व्यवहार पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे चिंता तर राहणारच आहे. शाळा, महाविद्यालय पूर्णपणे सुरू झालेले नाही, त्यामुळे व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाही. धान्य योजना अजूनही सुरू रहावी.
- मुकेश चौधरी
व्यवहार पूर्वपदावर नाही, पोटाची चिंता !
सध्या कोरोना कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक व्यवहार सुरू झालेले नाही. त्यामुळे पोट भरण्याची चिंता तर राहणारच आहे. धान्य योजना बंद झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. ही योजना यापुढेही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा आहे.
- कासूबाई पाटील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. डिसेंबर महिन्यापासून नियमित धान्य वाटप केले जाणार आहे.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी