इच्छाशक्तीच्या जोरावर ९८ व्या वर्षी कोरोनावर मात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:23+5:302021-05-09T04:17:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मातोश्री आनंदश्रमात सर्वात ज्येष्ठ असलेले पांडुरंग लक्ष्मण काळे (वय ९८) यांनी सुमारे दीड ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मातोश्री आनंदश्रमात सर्वात ज्येष्ठ असलेले पांडुरंग लक्ष्मण काळे (वय ९८) यांनी सुमारे दीड ते दोन महिन्यापूर्वी कोरोनावर मात केली. त्यानंतर ते पुन्हा आश्रमात आले आणि शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी कडुनिंबाचे रोप लावून आपला वाढदिवस साजरा केला तसेच ९८ झाडे लावण्याचा संकल्पदेखील केला.
फेब्रुवारीला महिन्यात पांडुरंग काळे हे काही कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यात पारनेरला गेले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना सहा-सात दिवसांनी श्वसनालाही त्रास होऊ लागला. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ऑक्सिजनची गरज लागली. तसेच त्यांचा एचआरसीटी स्कोअरदेखील १५ पर्यंत गेला होता. त्यांना अन्न हे मिक्सरमधून बारीक करून द्यावे लागते. त्यामुळे घरून जेवणाचा डबा देण्याची परवानगी देण्यात आली. तसेच त्यांना डाव्या कानानेच थोडेसे ऐकू येते. हे नर्स आणि डॉक्टरांना समजण्यासाठी दोन दिवस लागले. त्यामुळे त्या काळात डॉक्टरांच्या सूचना त्यांना समजल्याच नाहीत. नंतर उपचारांना साथ दिल्याने त्यांना अकराव्या दिवशी बाह्य ऑक्सिजन पूर्ण बंद करण्यात आला आणि घरी पाठवण्यात आले. नंतर काही दिवसांनी ते जळगावला मातोश्री आनंदाश्रमात परत आले. त्यांचे पुत्र संजय काळे या प्रकल्पाचे सहप्रमुख आहेत. सध्या दोघेही पितापुत्र जळगावला या आनंदाश्रमातच राहतात.
पांडुरंग काळे फेब्रुवारी २०१७ मध्ये बदल म्हणून त्यांचे पुत्र संजय यांच्याबरोबर रहायला मातोश्रीत आले आहेत. येथील शुद्ध हवा, मोकळे वातावरण त्यांना आवडल्याने ते पाच वर्षांपासून येथेच राहत आहेत. काळे यांनी वाढदिवशी कडुनिंबाचे झाड लावले आणि पुन्हा विविध जातींची ९८ झाडे लावण्याचा संकल्पदेखील केला. तो या पावसाळ्याच्या आधीच आम्ही पूर्ण करणार असल्याचे त्यांचे पुत्र संजय यांनी सांगितले.