आरटीईच्या प्रक्रियेत ओटीपीची अडसर दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:51+5:302021-03-19T04:15:51+5:30
जळगाव : आरटीईच्या राखीव जागांसाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना येणारी ओटीपी तांत्रिक अडचण मंगळवारी दूर झाली आहे. ...
जळगाव : आरटीईच्या राखीव जागांसाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना येणारी ओटीपी तांत्रिक अडचण मंगळवारी दूर झाली आहे. त्यामुळे आता प्रवेशाच्या संकेतस्थळावर पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची सोय उपलब्ध झाल्याने पालकांना आता सुरळीतपणे ऑनलाईन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागाकरीता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३ मार्च पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना पालकांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो. या ओटीपीच्या आधारे पालकांना पुढील अर्ज भरणे शक्य होते. मात्र मागील आठवड्यात अर्ज भरताना पालकांना ओटीपी येत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालकांच्या तक्रारी अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता मंगळवारी ओटीपीची अडचण दूर करण्यात आली आहे. पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात करावी अशी सूचना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून ४२२९ अर्ज
जळगाव जिल्ह्यात आर टी ई ची प्रवेश प्रक्रिया ही २९६ शाळांमधील तीन हजार ६५ जागांसाठी राबवली जात आहे. सोळा दिवसांमध्ये जिल्हाभरातून तब्बल ४ हजार २२९ पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहे. २१ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.