फुले मार्केटची मालकी नगरपालिकेचीच
By admin | Published: March 19, 2017 12:59 AM2017-03-19T00:59:59+5:302017-03-19T00:59:59+5:30
महसूलमंत्र्यांकडे महापौरांचा दावा: दोघं आमदारांची उपस्थिती, न्यायालयात जाण्याची पालिकेची भूमिका
जळगाव : महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा ही तत्कालीन नगरपालिकाच्या मालकीची असून, या मार्केटप्रश्नी शासनाने तातडीने निर्णय घेऊन पालिका व गाळेधारक यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महापौर नितीन लढ्ढा यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान केली. यातच फुले मार्केटच्या मुद्द्यावर शासनाकडून पालिकेस न्याय न मिळाल्यास पालिका न्यायालयात दाद मागणार असल्याचे महापौर लढ्ढा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या भेटीदरम्यान आमदार सुरेश भोळे व चंदुलाल पटेलही उपस्थित होते. मंत्रालयात पाटील यांच्या दालनात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. त्यात फुले मार्केटसह हुडको, शिवाजीनगर आणि पिंप्राळा उड्डाणपुलाबाबत निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या.
जागेबाबत कागदपत्रे केली सादर
फुले मार्केटची जागा शासन किंवा महसूल विभागाची असल्याचा दावा करीत फुले मार्केटप्रश्नी शासनच निर्णय घेईल, असे महसूल विभागाने म्हटले आहे. या मुद्द्यावरून महापौर व महसूलमंत्री यांच्यात चर्चा झाली. त्यात महापौर यांनी फुले मार्केटची जागा ही नगरपालिकेचीच असल्याचे काही कागदपत्र सादर केले.
फुले मार्केट ज्या सर्वे नंबरमध्ये आहे त्याच सर्वे नंबरमध्ये काँग्रेस भवनच्या जागेचे खरेदीखत १९५५ मध्ये तत्कालीन नगरपालिकेने केले व पालिकेकडे त्यासंबंधीचा भरणा झाला. नंतर १९७५ मध्ये महात्मा फुले मार्केटनजीकच्या महिला मंडळाच्या जागेचे खरेदी खतही तत्कालीन पालिकेने केले. सर्वे नंबरची मालकी असल्याशिवाय खरेदीखत कुठली संस्था करू शकत नसल्याची बाब महापौर लढ्ढा यांनी महसूलमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली.
पिंप्राळा व शिवाजीनगर पूल केंद्रीय योजनेत समाविष्ट करा, अशी मागणी महापौर यांनी महसूलमंत्री पाटील यांच्याकडे केली.
२८ रोजी मुंबईत बैठक
फुले मार्केटच्या जागेच्या मालकीबाबत येत्या २८ रोजी मुंबई येथे महसूल विभागाच्या सचिव व इतर वरिष्ठ अधिकाºयांसोबत बैठक घेतली जाईल. त्यात याबाबत सविस्तर चर्चा होऊन कुठलातरी निर्णय घेण्यापर्यंत विषय पुढे जाऊ शकतो, असे महसूलमंत्री यांनी महापौर यांना सांगितले.