...अन् मध्यरात्री २ वाजता उपलब्ध झाला ऑक्सिजन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:23+5:302021-04-25T04:16:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मध्यरात्रीचे २ वाजलेले अन् फोनची रिंग वाजते... हॅलो साहेब, अमळनेर येथून बोलतोय, आमच्या रुग्णासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मध्यरात्रीचे २ वाजलेले अन् फोनची रिंग वाजते... हॅलो साहेब, अमळनेर येथून बोलतोय, आमच्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेड खूप आवश्यक आहे, काहीही करा, बेड उपलब्ध करून द्या आणि फोन कट होतो. दुसऱ्याच क्षणी अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाभरातील बेडची स्थिती जाणून घेतली जाते आणि पंधरा मिनिटांत एरंडोल येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती संबंधिताला दिली जाते. काही वेळातच रुग्णाला बेड उपलब्ध होतो आणि पुढील उपचाराला सुरुवात होते. अभाविपच्या कार्यतत्परतेमुळे वेळीच उपचार मिळाल्यामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. बाधितांची संख्या वाढल्यामुळे सध्या कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, तर कुठे बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोरोना हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात रुग्णाला व त्याच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केले जाते. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता हेल्पलाइनच्या फोनची रिंग वाजली. अभाविपच्या कार्यकर्त्याने फोन उचलताच, समोरून घाबरलेल्या आवाजात एका कोरोनाबाधित रुग्णाचे नातेवाईक बोलत असून, आम्ही अमळनेर येथे राहतो. आमच्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. आम्हाला मदत करा, अशी विनंती केली. त्यावर कार्यकर्त्याने त्या माणसाला धीर देत, काळजी करू नका, थोडा वेळ थांबा, असे सांगितले.
व्यवस्था करतो अन् कॉल कट झाला
विनंती करणाऱ्या व्यक्तीचा फोन कट होताच, अभाविपच्या कार्यकत्याने मध्यरात्री ऑक्सिजन बेड कुठे शिल्लक आहेत, याची माहिती घेतली. अखेर पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर एरंडोल येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. कार्यकर्त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीस कॉल करून एरंडोल येथे बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली. संबंधितांचा संपर्क क्रमांकसुद्धा दिला. संबंधित रुग्णालयातूनदेखील प्रतिसाद मिळताच, मध्यरात्रीच बाधित रुग्णाला एरंडोल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती स्थिर असून, अभाविपच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.