१५ जुलैपर्यंत जीएमसीत ऑक्सिजन जनरेशन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:42+5:302021-05-24T04:15:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही आता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार प्रकल्प कार्यान्वयीत होणार असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही आता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार प्रकल्प कार्यान्वयीत होणार असून, याच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. १ जून रोजी या निविदा उघडण्यात येणार आहे. साधारण १५ जुलैपर्यंत हा प्रकल्प सुरू होऊन दिवसाला यातून २७५ ते ३०० सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्याची आणीबाणी निर्माण झाली होती. मोठे संकट नसले तरी प्रशासकीय यंत्रणेची रात्र-रात्रभर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धावपळ सुरू होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियमित ८ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन लागत होते. आता ही मागणी कमी होऊन साडेपाच टनांवर आली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता बघता ऑक्सिजनची मागणी वाढणार असल्याचे सांगितले जात असताना, त्यासाठी आधीच तयारी म्हणून रुग्णालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा नियोजनकडून १ कोटी ७० लाखांचा निधी यासाठी मिळाला असून, निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी ३ निविदा सध्या प्राप्त आहेत. १ तारखेला निविदा उघडण्यात येणार आहे. या ऑक्सिजन प्रकल्पातून दर मिनिटाला १३५५ लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. दिवसाला २७५ ते ३०० सिलिंडर ऑक्सिजन यातून निर्माण होणार आहे. शिवाय २० केएलचा ऑक्सिजन टँक आहे. त्यामुळे जीएमसीची ऑक्सिजनची मागणी बऱ्यापैकी यावर भागू शकत, शिवाय टँकर न आल्यास हा मोठा बॅकअपही राहणार आहे. १५ जुलैपर्यंत हा प्लांट रुग्णालय परिसरातच होणार असल्याचे डॉ. रामानंद यानी सांगितले.