तापमानावर मात करण्यासाठी साकारले जाताहेत ‘आॅक्सिजन पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:52 PM2020-01-01T12:52:11+5:302020-01-01T12:52:53+5:30
२६ ठिकाणी होताहेत पार्क
अजय पाटील
जळगाव : तापमानात होत असलेल्या बदलामुळे जळगावकरांना उन्हाळ्यात प्रचंड तापमानाचा सामना करावा लागतो. त्या तापमानाला काही प्रमाणात नियंत्रणात आणता यावे यासाठी शहरात अमृत योजनेंतर्गत २६ ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी १० ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ चे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२० मध्ये सर्वच पार्कचे काम पूर्ण होवून तेथे लावण्यात आलेल्या वृक्षांमुळे उन्हाळ्यात तापमान नियंत्रणात येईल.
शहरात २०१५-२०१६ पासून आॅक्सिजनपार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, शासकीय मंजुरी, जागांची निवड या प्रक्रियेमुळे या कामाला गती नव्हती. मात्र, मावळत्या वर्षात २६ पैकी आॅक्सिजन पार्कच्या कामांना वेग येवून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५ कोटी रुपयांमध्ये हे आॅक्सिजन पार्क विकसित करण्यात येत आहे.
पक्ष्यांसाठी ठरणार नंदनवन
आॅक्सीजन पार्क नागरिकांसह पक्ष्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. शुध्द हवेसोबतच सावली देखील मिळणार आहे.
मेहरूण, निमखेडी, पिंप्राळा, जळगाव शिवार गट २८०, ६९, मेहरूण तलाव परिसर, खोटेनगर, ढाकेवाडी, रायसोनी नगर, खेडी, शिव कॉलनी, नुतन वर्षा कॉलनी, नेहरु नगर, मोहन नगर, ट्रान्सपोर्ट नगर, रिंगरोडसह अन्य ठिकाणी हे पार्क तयार करण्यात येत आहे.
आॅक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवड
शासनाच्या वृक्ष लागवडीप्रमाणे या पार्क मध्ये वृक्ष लागवड करण्यात येत नाही. वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अधिक असावे म्हणून ७ फुटाच्या वृक्षांची लागवड या पार्क मध्ये करण्यात आली आहे. तसेच २ ते ५ मीटरच्या अंतरावर हे वृक्ष लावण्यात आले आहेत.
या पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागेचा विचार करण्यात आलेला नाही, केवळ जास्तीत जास्त आॅक्सीजन देणारे वृृक्ष या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच जॉगींग ट्रॅकची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे.
या पार्कमध्ये लावण्यात वृक्षांमध्ये आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कडूनिंब, औदुंबर, पिंपळ, बांबू व वड या वृक्षांचा समावेश आहे. पिंपळ वृक्ष २४ तासापैकी २२ तास आॅक्सीजन देतो. एका पिंपळाच्या वृक्षाच्या पानातून तासाभरातच ५ मिलीलीटर आॅक्सीजन तयार होतो. तर बांबूचे वृक्ष वेगाने वाढणारे व फ्रेश हवा देण्यासाठी ओळखले जाते. याच वृक्षांची लागवड या पार्कमध्ये करण्यात आली आहे.
आॅक्सीजन पार्कचा मुळ उद्देश शहरात वाढत जाणाºया तापमानाला नियंत्रणात आणण्याचा आहे. या पार्कमध्ये जास्तीत जास्त आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली असून, हे वृक्ष पुर्णपणे जगतील यासाठी ७ फुट उंची असलेल्याच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
-योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता, मनपा
वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. जास्तीत जास्त वृक्षांची लागवड झाली तर वातावरणावर देखील परिणाम होतो. ज्या भागात‘आॅक्सीजन पार्क’ तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणच्या तापमानावर नक्कीच फरक पडेल. वृक्षांच्या लागवडमुळे पक्ष्यांना देखील फायदा होईल.
-राजेंद्र नन्नवरे, पर्यावरण अभ्यासक