‘व्हर्टिकल गार्डन’च्या माध्यमातून मनपात होतेय ऑक्सिजन निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:19+5:302021-05-29T04:13:19+5:30
सतरामजलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेय व्हर्टिकल गार्डन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व किती ...
सतरामजलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेय व्हर्टिकल गार्डन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात येते. महापालिकेत देखील २५ फुटांचे १६ वेगवेगळे स्टॅण्ड तयार करून ऑक्सिजन देणाऱ्या राेपांची लागवड करण्यात आल्यानेे सतरामजलीत हिरवळ अनुभवास येत आहे.
वाढते प्रदूषण लक्षात घेता जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने अनेक ठिकाणी कृत्रिमरीत्या ऑक्सिजन तयार करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले. तसेच भविष्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे देखील ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून अमृत अभियानांतर्गत गेल्या काही वर्षांपासून हरित क्षेत्रांची निर्मिती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाने नागरिकांची प्रचंड वर्दळ असलेल्या ठिकाणांची निवड करत त्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महापालिकेला १० लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून २ लाख ८५ हजार रुपये व्हर्टिकल गार्डनसाठी खर्च केले जात आहेत.
मनपाच्या सर्व मजल्यांवर तयार झाले गार्डन
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यापासून ते सतराव्या मजल्यापर्यंत व्हर्टिकल गार्डनसाठी स्टॅण्ड तयार करण्यात आले आहेत. सतरामजलीत एकूण १६ स्टॅण्ड लावण्यात आले आहेत. यात एक स्टॅण्ड २५ फुटांचे असून, त्यात सुमारे ८० ते १०० फुलांच्या राेपांची लागवड करण्यात आली आहे. या राेपांना २४ तास पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. महापालिकेच्या काही मजल्यांवर सध्या व्हर्टिकल गार्डनमधील हिरवळ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
जनजागृतीवर हाेणार ३ लाख खर्च
गेल्या दोन महिन्यांपासून मनपाच्या प्रत्येक मजल्यावर हेच गार्डन उभारण्यात आले असून, काही मजल्यांवरील वृक्ष कोरडे पडले आहेत. गार्डनमध्ये लावण्यात येणारी वनस्पती पुण्याहून मागवली जात असते. ज्या ठिकाणी वनस्पती कोरडी पडली आहे, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने या वनस्पतीची लागवड केली जाणार आहे. दरम्यान, पर्यावरणाचे संवर्धन झाल्यास ऑक्सिजन निर्मिती शक्य हाेणार आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण हाेणे गरजेचे आहे. याच उद्देशाने या कार्यक्रमातील उर्वरित ३ लाख रुपये जनजागृतीसाठी खर्च केले जाणार आहेत. यात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे शाखा अभियंता चंद्रकांत साेनगिरे यांनी सांगितले.