ऑक्सिजनची स्थिती आणीबाणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:17+5:302021-04-11T04:16:17+5:30
पोलीस बंदोबस्तात येतोय टँकर : पुरवठा कमी असल्याने तारांबळ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरपासून ऑक्सिजनची मागणी प्रचंड ...
पोलीस बंदोबस्तात येतोय टँकर : पुरवठा कमी असल्याने तारांबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिनाभरपासून ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढल्याने व पुरवठादार कंपन्यांची संख्या कमी असल्याने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आणीबाणी निर्माण झाली आहे. जिल्ह्याची आवश्यकता ५० टन लिक्विड ऑक्सिजनची असताना ३० टन माल उपलब्ध होत असल्याने अगदीच गंभीर अवस्थेत हा पुरवठा केला जात आहे. २४ तासात दुसरे टँकर आले तरच पुरवठा सुरळीत राहील अशी अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाल्याने हे टँकर लवकर पोहाेचावे म्हणून पोलीस बंदोबस्तात आणण्यात येत आहेत.
राज्यभरात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. जळगावातही कोरोनाचा रुग्णवाढीचा वेग प्रचंड असून गेल्या पंधराच दिवसात २० हजारांच्या आसपास रूग्ण आढळून आले आहेत. यात ऑक्सिजन पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढून थेट १४०० वर पोहोचली आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे.
कंपनी बदलल्याने ताळमेळ चुकला
जळगावला पुरवठा करणारी कंपनी अचानक वरिष्ठ पातळीवरून बदलविण्यात आल्याने ताळमेळ चुकला, पुरवठादारांना याची कल्पना नव्हती. शिवाय कंपनी व पुरवठादारांचा समन्वय, रूट माहीत असणे या बाबी पुरवठ्यासाठी अत्यंत सोयीच्या होत्या. अचानक कंपनी बदलल्यानेही पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
अशी आहे आणीबाणी
एका टँकरमध्ये पंधरा टन लिक्विड जळगावात येत असतो. असे दोन टँकर दिवसाला येतात. मात्र, ते तातडीने वापरले जातात, ऑक्सिजनचा साठा करणेच शक्य होत नाही, एवढी मागणी आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी येणाऱ्या टँकरवरच पुढची मदार असते, जर या टँकरला काही अडचण आली तर मोठी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या टँकरसाठी आमची माणसे बॉर्डरवर बसलेली असतात, सर्व यंत्रणा अगदी डोळ्यात तेल टाकून कार्यरत असल्याचे पुरवठादार अग्रवाल यांनी सांगितले.
कोट
सध्या १५ ते २० टन ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सिजनचा समान पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आयुक्त अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त काळे यांच्याकडे केली. जळगाव जिल्ह्यावर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात अन्याय होऊ नये अशी आपली मागणी आहे.
-गुलाबराव पाटील, पालकमंत्री ,जळगाव.
------
कोट
जिल्ह्याला ऑक्सिजनचा दोन दिवसाआड पुरवठा होत आहे. ऑक्सिजनची उपलब्धता पाहून मागणी केली जाते. सध्या आवश्यकतेइतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजनचे टॅंकर ऑन द वे आहेत. काही मध्यरात्री २ वाजता तर काही रविवारी दुपारपर्यंत पोहचणार आहेत.
अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.
कोट
गेल्या दीड महिन्यांपासून १२ रुपयात मिळणारा माल ५० रूपये देऊन मागूनही मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याला ५० टन लिक्विड ऑक्सिजनची गरज असताना ३० टन उपलब्ध होत आहे. शिवाय आपले टँक हे कंपन्यांपासून ४५्० किमी असल्याने अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत डोळ्यात तेल टाकून याचा पुरवठा करावा लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. - नरेंद्र अग्रवाल, शिवम ऑक्सिजन, पुरवठादार
कोट
२४ तासात पुरेल एवढे ऑक्सिजन प्राप्त होत असून ते संपण्याआधी दुसरे टँकर पोहोचत आहे. सर्वत्रच तुटवड्याची परिस्थिती आहे. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक