पाण्यासाठी श्रमदानाला दिले जातेय प्रोत्साहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:25 AM2019-04-16T08:25:27+5:302019-04-16T08:29:21+5:30
जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी तर काही ठिकाणी केवळ पाण्यासाठी शोषखड्डे, बंधारे आदी कामे गावकऱ्यांनी श्रमदानातून हाती घेतले आहेत.
जळगाव - जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी तर काही ठिकाणी केवळ पाण्यासाठी शोषखड्डे, बंधारे आदी कामे गावकऱ्यांनी श्रमदानातून हाती घेतले आहेत. या कामांना प्रोत्साहन देण्याचे तसेच मदतीचा हात देण्याचे काम काही सामाजिक संस्था व संघटना करू लागल्या आहेत. श्रमदानासाठी लागणारे साहित्य गावकऱ्यांना दिले जात आहे. याचबरोबर श्रमदान करणाऱ्यांची दाढी मोफत, महिलांना कर्णफुले भेट असे प्रोत्साहीतही केले जात आहे.
कुंभारीत महिलांना मिळणार कर्णफुले
तोंडापुर ता.जामनेर येथुन जवळच असलेल्या कुंभारी गावास साई सुवर्ण बहुऊद्देशिय सामाजिक संस्थेकडून श्रमदानाची कामे करण्यासाठी टीकम,पावडे, टोपले ,पहार आदी साहिंत्य भेट दिले. सरपंच सुरातसिंग जोशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी हे साहित्य स्विकारले. कुंभारी या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेला असून संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कुंभारी येथील सुवर्ण सखी या कंपनीच्या संचालिका ज्योतिका साळवे यांच्या कडून श्रमदानासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस एक ग्रँम सोन्याचे पॉलिश असलेले कर्णफुले देण्यात येतील असे कंपनी व्यवस्थापक कोमल सिताफुले यांनी सांगितले तर औरंगाबाद येथील वोडाफोन कंपनीचे व्यवस्थापक शिंदे यांनी गावासाठी एक हजार झाडे दिली. उपसरपंच नवलसिंग जाधव, डिगंबर जोशी, अशोक भिसे, मंगल पाटील,सतिष बिहार्डे, पोलीस पाटील विजय जोशी, प्रदिप पाटील, सुरतसिंग पाटील व ग्रा. पं. सदस्यांसह नागरीक उपस्थित होते.
रोटवद येथे श्रमदान करणाऱ्यांची मोफत दाढी
रोटवद ता. जामनेर येथे पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाचे काम सुरू आहे. या जल चळवळीत गावातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने सहकार्य करत आहे कुणी अन्न दान, जलदान, श्रमदान करत आहे. तर विश्वास दत्तू चित्ते या युवकाने श्रमदानासाठी येणाऱ्या लोकांना श्रमदानाच्याच ठिकाणी मोफत दाढी करून देण्याचा संकल्प केला आहे. या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रमदानासाठी मोठ्या प्रमाणावर साहित्याची गरज ओळखून रोटवद येथील भूमिपुत्र राजेश देशमुख यांच्या प्रयत्नाने रोटरी क्लब जळगावच्या वतीने शंभर टिकाव, शंभर पावडे व शंभर टोपली असे साहित्य मोफत उपलब्ध करुन देण्यात आले .
वसुंधरा फाऊंडेशनकडून साहित्याची मदत
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदानाचे कार्य सुरू झाले आहे. १० रोजी वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावचे संस्थापक सचिन पवार यांनी यासाठी आवश्यक ४० पावडी, २० टिकम, ३० घमेले वसुंधरा फाउंडेशन तर्फे रांजणगाव ग्रामपंचायतीस भेट दिले आहे. यावेळी सरपंच सोनाली शेखर निंबाळकर, फाउंडेशनचे सचिव सुनील भामरे, अंजली भामरे उपस्थित होते. वसुंधरा फाउंडेशनच्या सदर कार्याचे डॉ. उज्वल चव्हाण, आयकर आयुक्त डॉ. उज्वला देवरे, शेखर निंबाळकर, डॉ. मनोहर भामरे यांनी स्वागत केले.