पाचोरा, भडगावला ‘जनता कर्फ्यू’ला उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 10:14 PM2021-05-15T22:14:56+5:302021-05-15T22:17:08+5:30
पाचोरा, भडगाव तालुक्यात पुकारलेल्या पाच दिवसीय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा/भडगाव : पाचोरा, भडगाव तालुक्यात पुकारलेल्या पाच दिवसीय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा-भडगावात तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी व तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडित करता यावी यासाठी आमदार किशोर पाटील, सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे १४ मेच्या रात्री १२ वाजेपासून पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूला आज सुरुवात झाली असून नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी संपूर्ण बंद पाळत उस्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
पाचोरा शहरातील केवळ मेडिकल पूर्ण वेळ आणि दुध डेअरी या सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ६ ते ९ या वेळात वगळता शहरातील सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने, किराणा दुकाने भाजीपाला मंडई संपूर्णपणे बंद होते. पोलिसांकडून देखील अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत होती. शासकीय बँक आणि कार्यालय वगळता कोणतेही दुकान अथवा कार्यालय उघडे नव्हते. पाचोरा शहरातील मुख्य बाजारपेठ स्टेशन रोडवरील सर्व दुकाने पूर्णपणे बंद होती. बसस्थानकातदेखील शुकशुकाट दिसून आला. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस प्रशासनाकडून अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत होती. याशिवाय नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ खूपच नगण्य स्वरूपात दिसत होती.
भडगावात जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दुध डेअऱ्या, कृषी केंद्र, दवाखाने आदि दुकाने सकाळपासूनच सुरु होती. किराणा दुकानांसह काही इतर दुकाने मात्र दबकत ‘चोरी चुपके’ सुरु असल्याची नागरिकात चर्चा होती. किराणा दुकाने, कापड दुकाने, हार्डवेअर दुकाने, सलून दुकाने व इतर दुकाने, भाजीपाला, फळविक्री दुकाने बंद दिसून आली. बसस्थानक भाग, मेनरोड, बाळद रोड, पाचोरा रोड यासह इतर भागात दुकाने, व्यापारी संकुले बंद दिसून आली. सकाळून बाजार पेठांसह रस्त्यांवर तुरळक नागरिकांची वर्दळ दिसून आली. मात्र दुपारनंतर बाजारपेठेत व रस्त्यांवर बंदमुळे शुकशुकाट दिसून आला.