पाचोरा पीपल्स बँकेचे मु. का. अधिकारी निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:10 PM2019-05-30T18:10:58+5:302019-05-30T18:11:37+5:30
आरोप : कारवाई आहे बेकायदेशीर
पाचोरा : दि पाचोरा पीपल्स को. आॅप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्यावर प्रशासकांनी ठपके ठेवत निलंबनाची कारवाई केली. ही माहिती प्रशासकांनी बँकेच्या कार्यालयात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बँकेचे अशासकीय प्रशासक अॅड. प्रशांत कुलकर्णी व सीए प्रशांत अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून १ कोटी ४८ लाख नफा यावर्षी राजकीय घडामोडीनंत बँकेस मिळाला आहे. ठेवीदारांसाठी व्याजदर वाढवले असून थकीत कर्जवसुलीची मोहीमही जोरात सुरू आहे.
दरम्यान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांनी कर्जवाटप चुकीच्या पद्धतीने करून नियमबाह्य कामे केल्याचे दिसत आहे. कर्जवसुलीत बाधा आणून बँकेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. चेक डिस्काउंट , कर्जप्रकरणात त्रुटी ठेवणे, गोडाऊन लोन प्रकरणी अनियमितता असणे या कारणाने टिल्लू यांची चौकाशी पूर्ण होईपावेतो त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान सदर निलंबन प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांचेशी संपर्क साधला असता माझी नियुक्ती ही रिझर्व्ह बँकेच्या नियमाने असून प्रशासकांनी केलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असुन माझे कामकाज नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.