पाचोरा तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 08:24 PM2020-09-14T20:24:07+5:302020-09-14T20:24:15+5:30
पिकांचे नुकसान : हिवरा नदीला महापूर, जनजीवन झाले विस्कळीत
पाचोरा : शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात १२ रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. गाळण भागात अतिवृष्टी होऊन १२६ मिमी पावसाची नोंद झाली. नांद्रा व कुºहाड भागात मात्र पाऊस पडला नाही. तर अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.
शहरात मुसळधार पाऊस पडूनही २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली ती शंकास्पद असल्याची भावना शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.नगरदेवळा भागात ८० मिमि पिंपळगाव हरे ४२ मिमी, वरखेडी ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पाचोरा तालुक्यात आजपर्यंत ६२०.९९ मिमी सारसरीपावसाच नोंद झाली आहे.
काही शेतांमध्ये साचले पाणी
शिंदाड भागात रत्नाबाई संजय पाटील या महिलेच्या शेतात नाल्याचे पाणी घुसून कपाशीचे शेत वाहून नुकसान झाले. शिवारात बऱ्याच ठिकाणी मक्का , ज्वारी , बाजरी ही पिके आडवे पडली. तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
आॅक्सिजन सिलिंडर पाण्यातून नेताना कसरत
अत्यावश्यक सेवेसाठी असलेले व दवाखान्यात लागणारे आॅक्सिजन सिलेंडर घेऊन जाताना मोटरसायकल पाण्यातून नेताना बंद पडली. रुग्णाच्या नातेवाईकांना मोठी कसरत करत हे सिलिंडर पाणी साचलेल्या भुयारी मागार्तूनच घेऊन जावे लागेले. शहराच्या या भयानक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाचे विरुद्ध संतापाची लाट उसळली. दरवेळी पाऊस पडला की, येथे पाणी साचते.
जलाशये झाले ओव्हरफ्लो
तालुक्यातील बहुळा, हिवरा, अग्नावती हे तीनही मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. २२ लघु प्रकल्पात सार्वे पिंपरी, राजुरी, अटलगव्हाण, कोल्हे, डांभुर्णी, पिंपरी, पिंपळगाव, घोडसगाव, गाळण १ व गाळण २, खाजोळे, सारवे, दिघी१ व दिघी२, सातगाव, गहुले, म्हसळा, वाकडी, लोहारा, बांंबरुड, गारखेडा, मोहाडी आदी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून पाझर तलाव देखील ओव्हरफ्लो झाले आहेत.
दोन भागांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. पाचोरा शहरात रात्री ११ ते २ च्या सुमारास मुसळधार पासावने रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहराचा पश्चिम भागाशी संपर्क तुटला. शहरातून जाणाºया हिवरा नदी वरील पुलावरून पुराचे मोठे प्रमाणात पाणी वाहत असून कृष्णापुरी भागाचाही पाचोरा शहराशी संपर्क तुटला. परिणामी या लोकांना खूप फेºयाने ये- जा करावी लागली. त्यातच शहरात प्रवेश करणारा एकमेव जळगाव चौफूली बस स्टँडरोड असल्याने या मार्गावर काँक्रिटीकरण कामामळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाली. सुमारे दोन दोन तास नागरिकांना ताटकळावे लागले.