पालिकेच्या निवडणुकीचे वाजताहेत पडघम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:25+5:302021-09-22T04:18:25+5:30

बरोबर ५७ महिन्यांपूर्वी भाजपने चाळीसगाव नगरपालिकेसाठी प्रथमच ‘कमळा’चा झेंडा खांद्यावर घेऊन शविआच्या ४५ वर्षांच्या सत्तेविरुद्ध शड्डू ठोकले होते. गेल्या ...

Padgham on the eve of municipal elections! | पालिकेच्या निवडणुकीचे वाजताहेत पडघम!

पालिकेच्या निवडणुकीचे वाजताहेत पडघम!

Next

बरोबर ५७ महिन्यांपूर्वी भाजपने चाळीसगाव नगरपालिकेसाठी प्रथमच ‘कमळा’चा झेंडा खांद्यावर घेऊन शविआच्या ४५ वर्षांच्या सत्तेविरुद्ध शड्डू ठोकले होते. गेल्या अनेक वर्षांत असे पहिल्यांदाच भाजपकडून पालिकेतील सत्तेला ललकारले गेले. यापूर्वीही असे प्रयोग झाले असले तरी, मिळालेले यश सत्तापरिवर्तनापर्यंत पोहोचले नव्हते. म्हणूनच मागील निवडणूक शहरातील राजकारणाची भाकर फिरविणारी रणधुमाळी ठरली होती. भाजपची पालिकेतील सत्ता एक ‘जुगाड’ असल्याने सुरुवातील ‘हनिमुन’ पर्व सुखकारक ठरले. मात्र पुढच्या रणधुमाळीचे मुहूर्त जसे जवळ येऊ लागले तसे भाजपच्या जहाजातून पहिल्यांदा दोन अपक्ष तर नंतर शिवसेनेच्या एका सदस्याने उडी मारत शविआची एक्सप्रेस पकडली. शविआच्या दोन सदस्यांना तिसरे अपत्य प्रकरणात अडचणीत आणले गेले. विधानसभेतील सत्तांतरानंतर नगरविकास मंत्र्यांनी यावर स्टे दिल्याने शविआचे संख्याबळ पुन्हा वाढले. भाजपच्या सत्ता पर्वाचे हे अखेरचे वर्ष. यावर्षातच भाजपची सत्ता अल्पमतात आली. स्थायी समितीत शविआने बहुमत मिळविले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मात्र रस्त्याची वाट लागल्याने नागरिकांची मोठी नाराजी आहे. ऐन पावसाळ्यात 'चिखल-गाळात' फसलेले - रुतलेले चाळीसगाव. अशी एक प्रतिमाच सोशल माध्यमावर तयार झाली आहे. नागरिकांनी आपला राग असा व्यक्त केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या उंबरठ्यावरच असे पडघम वाजू लागल्याने पालिकेचा आखाडा चांगलाच गाजणार यात संदेह नाही. एकेरी वॉर्ड की बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, असा निर्णयाचा लंबक अजून स्थिर असला तरी, 'बॅनरवरच्या समाजसेवकांची' वरात प्रत्येक चौकात दिमाखात झळकत आहे. निवडणुकीपूर्वीचे हे मोसमी वारे पुढील 'राजकीय हंगामाची' दिशा स्पष्ट करणारे ठरावे. येत्या काळात संपूर्ण तालुक्यातही निवडणुकीचे डफ वाजणार आहेत. सहकारी संस्थांसह शिक्षणसंस्था, बाजार समिती यांच्या निवडणुकाही होतील. वर्षाच्या शेवटाला जसे निवडणुकांचे फटाके फुटतील तसे ते नवीन वर्षातही फुटणारच आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे सामनेही रंगतदार होणार आहेत. कोणत्याही निवडणुका जुनी समीकरणे मोडून नवा अध्याय लिहित असतात. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे नेपथ्थच पुढील दोन वर्षांत होणाऱ्या या लहान - मोठ्या निवडणुकांतून साकारले जाणार आहे. आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, खासदार उन्मेष पाटील यांच्या 'राजकीय दिग्दर्शना'ची यातून कसोटी लागणार, एवढे मात्र निश्चित आहे.

Web Title: Padgham on the eve of municipal elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.