पादुका प्रथमच पंढरपूरला जाणार वाहनाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:21 PM2020-05-31T17:21:01+5:302020-05-31T17:24:27+5:30
पालखी परंपरा खंडित न करता पादुका वाहनाने पंढरपूरला नेत वारी करण्याचा निर्णय मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा कोरोना महामारीचे सावट असल्याने आषाढी वारीबाबत अनेक दिवसांपासूनचा भाविकांतील संभ्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेत दूर केला आहे. पालखी परंपरा खंडित न करता पादुका वाहनाने पंढरपूरला नेत वारी करण्याचा निर्णय मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. मुक्ताबाई संस्थान व समस्त मुक्ताबाई फडावरील दिंडीकरी वारकरी भाविकांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.
खान्देश, मध्य प्रदेश, विदर्भ व मराठवाडा या भौगोलिक प्रदेशातून आषाढीसाठी पंढरपूर जाणारा एकमेव मानाचा पालखी सोहळा आहे. तापीतीर ते भीमा तीर अशी ७५० कि.मी. अंतर ३४ दिवसात हजारो वारकरी गेल्या ३११ वर्षांपासून एक-दोन वेळेचा अपवाद वगळता अखंडितपणे पायी वारी करीत आहेत. यावर्षी कोरोना आजाराचे संकट निरंतर गडद होत असल्याने संसर्ग टाळण्यासाठी वारकऱ्यांनी शासनास सहकार्याची भूमिका घेतली.
वारी खंडित न होता वारकरी प्रातिनिधिक स्वरुपात मानाच्या सात पालख्यांना वाहनाने नेवून वारीचा निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘निवत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या मानाच्या सात पालखी सोहळ्यांच्या पादुकांना वाहनाने का होईना विठ्ठल दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयावर संत मुक्ताबाई संस्थान कोथळी अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, दिगंबर महाराज, दिंडीप्रमुख दुर्गादास महाराज नेहते, सखाराम महाराज, दिंडीप्रमुख विश्वंभर महाराज तिजारे, संदीपन महाराज बºहाणपूर, कृष्णा गुरूजी, नितीनदास महाराज मलकापूर, सर्जेराव महाराज देशमुख अकोला, उध्दव जुनारे, विशाल महाराज खोले, विजय महाराज खवले, कैलास महाराज धोरण, पंकज महाराज व वारकरी फडकरी यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. तसेच विश्वातून कोरोना लवकर नष्ट करो असे साकडे पांडुरंगाला घातल्याची माहिती दिली.