लोनची रिकव्हरीसाठी धमक्या देतात पगारी गुंड, बंगळुरुच्या कंपनीचं चीन कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:42 AM2022-11-30T07:42:17+5:302022-11-30T07:42:49+5:30
कंपन्यांकडून डेटाही होतोय चोरी; सायबर गुन्हेगारीचे कनेक्शन चीनपर्यंत
सागर दुबे
जळगाव : लोन ॲपच्या माध्यमातून अनेकांना लुबाडणाऱ्या बंगळुरू येथील टोळीला जळगाव सायबर पोलिसांनी बेड्या ठोकताच या टोळीचे कनेक्शन चीनपर्यंत असल्याचे समोर आले आहे. लोन ॲपच्या माध्यमातून भारतातून गोळा झालेला पैसा चीनमध्ये ऑनलाइन व्यवहाराद्वारे पोहोचविला जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
जुलै महिन्यात पहुर येथील एका व्यक्तीला विविध लोन ॲप डाउनलोड करायला सांगून पैशांची मागणी केलेली नसतानासुद्धा ६ लाखांची रक्कम खात्यावर पाठविली होती. त्यानंतर ती रक्कम व्याजासह परत करावी म्हणून त्या व्यक्तीला सायबर चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन ४ लाखांची खंडणी उकळली होती. याबाबत सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस सायबर चोरट्यांच्या शोधार्थ होते. अखेर २६ नोव्हेंबरला बंगळुरू येथे पोलिसांना प्रवीण गोविंदराज (२८) व सतीश पेन चल्लेया (२१) हे दोन सायबर भामटे हाती लागले. अन् दोघांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले. या फसवणूक प्रकरणाचे चीन कनेक्शन असल्याचे समोर आले.
पगारी म्होरके नेमले...
चीन येथील व्यक्तीकडून बंगळुरूच्या टोळीकडे कॉल सेंटर चालवण्याचे काम देण्यात आले होते. या टोळीतील सदस्य बंगळुरूच्या कॉल सेंटरमध्ये बसून व्हॉट्सॲप कॉल व मेसेज करून कर्जदारांना धमकावत होते. विशेषत: कर्जदारांना धमकावून त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरून घेतले जात होते. जर कर्जदारांनी पैसे नाही भरले तर त्यांच्या फोटोंचे मॉर्फिंग करून अश्लील चित्रफीत आणि मजकूर बनवून तो कर्जदारांच्या मोबाइलमधील काँटॅक्ट लिस्टमधील नंबरवर व्हायरल करण्याचे काम या टोळीकडे सोपवण्यात आले होते. टोळीतील दोघांची पगारावर नेमणूक करण्यात आली होती.
संपूर्ण व्यवहार ऑनलाइन...
पोलिसांना चकविण्यासाठी खंडणीची रक्कम एका लिंकद्वारे मागवून ती विविध बँक खात्यांद्वारे पाठविली जाते. ही रक्कम देशातून चीनमधील व्यक्तीला ट्रान्स्फर झाल्यावर त्यानंतर विविध बँक खात्यांच्या माध्यमातून खंडणी मागणाऱ्या व धमकविणाऱ्याच्या खात्यावर पगाराची रक्कम जमा व्हायची. संपूर्ण ऑनलाइन व्यवहारासाठी सायबर चोरटे काही व्यक्तींचे भाड्यानेसुद्धा बँक खाते घेत होते. मात्र, कोटी रुपयांचे ट्रॅन्झॅक्शन झाल्यानंतर ७ दिवसांत हे बँक अकाउंट बंद किंवा ब्लॉक व्हायचे.