भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:13 PM2018-04-01T13:13:52+5:302018-04-01T13:13:52+5:30
सामान्य कार्यकर्त्याच्या मदतीसाठी उभी राहिली सोशल मीडियावर चळवळ
चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागेल... एवढे मी भोगिले की मज हसावे लागेल... कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे आपल्या व्यथा व वेदनांचा असा प्रांजळ हिशोब गाठीशी बांधून एका सामाजिक कार्यकर्त्याने बुद्धाचा धम्म पुजीला. वस्तीतल्या पोरांचीही धम्माबरोबरच संगिती बांधली. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या कार्यकर्त्याने कर्करोगाच्या वादळाशी युद्ध पुकारले आहे. त्यांच्या याच चांगुलपणाला सलाम करताना त्यांना कर्करोगाच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी सोशल माध्यमाच्या टचस्क्रिनवर माणुसकीची चळवळच उभी राहिली आहे.
जळगावच्या शिवाजी नगरातील महामाया बौैद्ध विहाराच्या माध्यमातून एक संस्कारित पिढी घडविणाºया अवलिया सुकलाल पेंढारकर याची ही कहाणी. बौद्ध विहाराच्या आजूबाजूला राहणाºया लोकांचे वैशिष्ट म्हणजे सर्व जण निव्यर्सनी. मोलमजुरी करतात. दररोज सायंकाळी कामे आटोपली की ही मंडळी पाच - दहा मिनिटासाठी एकत्र येतात. इथले पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी धम्माचे वाचन करीत असतात. या सर्वांमागे उभा आहे तो सुकलाल पेंढारकार नावाचा साधा कार्यकर्ता.
फक्त दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेले पेंढारकर हे जळगावच्या रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करतात. दरवर्षी ते बौद्ध परिषद ते घेत असतात. पण याची कुठेच प्रसिद्धी नाही कि फोटोसेशन नाही.
जनसेवेचे व्रत घेतलेल्या या कार्यकर्त्यांला दोन वर्षापूर्वी हातदुखीचा त्रास सुरु झाला. आजाराकडे दुर्लक्ष करुन सुकलाल यांची समाजाच्या भल्यासाठी भ्रमंती सुरु होती. याच भ्रमंतीने पुढे डोके वर काढले. हाताला गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची तपासणी केली तर ती कॅन्सरची निघाली. हे ऐकून पेंढारकर कुटुंबियांवर जणू आकाश कोसळले. जवळ पैशाचा पत्ता नाही. समोर फक्त अंधार. याही परिस्थितीत सुकलाल यांच्या भावाने आपल्याकडे होता तेवढा पैसा खर्च केला. आठ केमोथेरपी झाल्या.
शेवटी रेडीएशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यासाठी अर्थात पैसा लागणार होता. अशा अवस्थेत आपले राहते घर गहाण ठेवायचे, असा निर्णय त्यांनी घेतला. सुकलाल यांचे मित्र आणि बीएसएनएलमधील कर्मचारी किशोर बिºहाडे यांनी त्यास असे न करण्याचा सल्ला दिला.
या दरम्यान, बिºहाडे यांची भुसावळ पंचायत समितीमधील शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सुकलाल यांच्याविषयी सांगितले. अहिरे यांनी सर्व गोष्टींची खातरजमा करुन सोशल मिडीयावर मदतीची हाक दिली. या हाकेला जोरदार प्रतिसाद मिळाला. अगदी साध्या कर्मचाºयापासून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांपर्यंत सर्वांनी आपला वाटा उचलला आणि आणि बघता - बघता १४ दिवसात सव्वा लाखाची रक्कम जमा झाली.
गेल्याच महिन्यात सुकलाल पेंढारकर पुण्याच्या रुबी इस्पितळात दाखल झाले. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. पुढील महिन्यात आपण जळगावला येऊ आणि पुन्हा एकदा आपले सामाजिक कार्य सुरु करु, असा त्यांचा निर्धार आहे.
जळगावात अनेक वेळा मोर्चे निघतात आणि आंदोलने होत असतात. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना सुकलाल पेंढारकर यांची आठवण होते. कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता पेंढारकर हे मोठ्या मनाने यात सहभागी व्हायचे आणि आंदोलनाच्यावेळी झालेली गर्दीमागे सुकलाल पेंढारकर असायचे. असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
पण याच सुकलाल आप्पांवर ज्यावेळी वेळ आली त्यावेळी कुठलीही संघटना पुढे आली नाही की त्यांच्या आजारपणाविषयी कुणी चौकशी केली नाही, मदत तर दूर राहिली. कुणाकडेही मदतीची अपेक्षा न करता हा साधा कार्यकर्ता आजाराशी लढत राहिला आणि आता आजारावर मात करुन एक संस्कारीत पिढी घडविण्यासाठी पुन्हा एका जोमाने तयार होत आहे....