पाकिस्तानने भारताचा कापूस घेण्यास दिला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:10+5:302021-04-05T04:15:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कापसाची आवक आता पूर्णपणे थांबली असून, खासगी सह सर्वच सहकारी जिनिंगदेखील आता बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कापसाची आवक आता पूर्णपणे थांबली असून, खासगी सह सर्वच सहकारी जिनिंगदेखील आता बंद झाल्या आहेत. यावर्षी भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात झाल्याने, फेब्रुवारीनंतर कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. दरम्यान, पाकिस्तानकडूनदेखील भारताचा माल मिळावा यासाठी प्रस्ताव आला होता, मात्र पाकिस्तान संसदेने पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांचा प्रस्ताव नामंजूर केला असल्याने. भारताची निर्यात काही प्रमाणात वाढू शकणार होती त्यावर ठराविक परिणाम झालेला आहे.
दरवर्षी भारताकडून चाळीस लाख गाठींची निर्यात व्हिएतनाम , बांगलादेश, नेपाळ, चीन या देशांमध्ये केली जाते. मात्र यावर्षी इतर देशांच्या तुलनेत भारताच्या कापसाची गुणवत्ता चांगली होती. त्यातच ब्राझील व अमेरिकेच्या कापसाच्या तुलनेत भारताच्या मालाची किंमतदेखील कमी होती. यामुळे यंदा भारताच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी होती. याचाच परिणाम म्हणून यंदा भारताकडून ६६ लाख गाठींची निर्यात झाली असून, ही निर्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाला मागणी वाढल्याने, पाकिस्तानमधील कॉटन मिल्स, टेक्स्टाइल मिल्समधील व्यापाऱ्यांकडून भारताचा व्यापाऱ्यांशी संपर्क साधून भारताचा माल मिळावा यासाठी मागणी करण्यात आली होती. यासाठी पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांकडून भारताचा मालाला पाकिस्तानात आयात करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पाकिस्तान संसदेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानमधील संसदेने व्यापाऱ्यांचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. यामुळे भारताचा निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नसता तरी, पाकिस्तानने मंजुरी दिली असती तर भारताचा दहा लाख गाठींची निर्यात वाढली असती. तसेच पाकिस्तान सरकारने नामंजूर केलेल्या प्रस्तावामुळे खंडीच्या दरात काही परिणाम झाला असून, खंडीचे दर एक हजार रुपयांनी घसरले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खंडीचे दर ४६ हजार रुपये इतके आहेत.
खान्देशातून यंदा १५ लाख क्विंटल गाठींची खरेदी
खान्देश जिनिंग असोसिएशनचे संचालक प्रदीप जैन यांनी सांगितले की, दरवर्षी खान्देशात सरासरी १५ लाख गाठींची खरेदी होत असते. यंदा खरेदीत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात ३० टक्क्यांची घट झाली असून, यंदा १८ लाख गाठींची खरेदी होण्याची शक्यता होती. मात्र अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती प्रदीप जैन यांनी दिली.
- खान्देशात सुमारे ८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते.
- यंदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात कापसाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादनातदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
- यंदा कापसाचे लागवड क्षेत्र पाहता १८ लाख गाठींपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, पावसामुळे १५ लाख गाठींपर्यंत यंदाचे उत्पादन झाले आहे.
कोट..
यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. दरम्यान पुढील वर्षी लागवडीत वाढ होण्याची शक्यता असून, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पाहता शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी प्रमाणात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
-प्रदीप जैन, संचालक, खान्देश जिनिंग असोसिएशन
पाकिस्तानमधून जरी भारताचा माल घेण्यास नकार दिला असला, तरी भारताचा निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. यंदा काही वर्षांच्या तुलनेत भारतातील निर्यात वाढली आहे. तसेच पुढील वर्षीदेखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास कापसाला चांगले दिवस येऊ शकतात.
- हर्षल नारखेडे, कॉटन बाजारातील जाणकार