'गीतांजली'तील पाकीटमार भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:07 PM2019-12-22T18:07:05+5:302019-12-22T18:08:18+5:30
गीतांजली एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात प्रवासी चढत असताना पाकिटमाराने प्रवाशाचे पाकीट लांबविले होते. त्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत केली.
भुसावळ, जि.जळगाव : विभागातील जळगाव रेल्वेस्थानकावर ६ डिसेंबर रोजी गीतांजली एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात प्रवासी चढत असताना पाकिटमाराने प्रवाशाचे पाकीट लांबविले होते. त्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत केली. संबधित प्रवाशास पोलिसांनी रविवारी ४० हजार रुपये रक्कम परत केली.
गाडी क्रमांक १२८६० गीतांजली एक्सप्रेसच्या मागील सामान्य कोचमध्ये ६ डिसेंबर रोजी फियार्दी दीपक रणछोड पाटील (वय २८, रा.बीडगाव, ता.चोपडा) चढत असताना अज्ञात पाकीटमाराने त्यांच्या खिशातील पाकीट मारले. त्यात ७२ हजार रुपये होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी सीसीटीव्ही, फुटेजच्या आधारे व गुप्त माहितीवरून संशयित आरोपी शेख अखिल उर्फ भुऱ्या (रा.भुसावळ) व अमीर खान (रा.गेंदालाल मिल, जळगाव) यांना ताब्यात घेतले. पोलीस हवालदार आनंदा सरोदे यांनी संशयित पाकीटमारांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन ७२ हजारांपैकी ४० हजार रेल्वे पोलिसांना परत केले.
मिळालेली ४० हजार रक्कम ही रेल्वे लोहमार्ग पोलीस पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे व आनंदा सरोदे यांनी फियार्दी दीपक पाटील यांना परत दिली.