पाचोरा तालुका ओल्या दुष्काळाच्या खाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 02:32 PM2019-11-01T14:32:16+5:302019-11-01T14:33:17+5:30
अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत.
पाचोरा, जि.जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. तेव्हा तातडीने पंचनामे करून दिलासा द्यावा, अशा सूचना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या.
पाचोरा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सततच्या दुष्काळाने शेतकरी हैराण झालेले असताना ह्यावर्षी चांगला पाऊस झाला नद्या-नाले भरभरून वाहू लागले. धरणे १०० टक्के भरले. खरीप हंगाम १०० टक्के हाती येणार, अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाने महिनाभरापासून थैमान घातले आहे. यामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मक्का, ज्वारी बाजरी, वेचणीला आलेला कापूस, कापसाच्या पक्क्या कैºया, कडधान्य आदी पिकांची पूर्णपणे धूळधाण उडाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. यामुळे हे वर्षही ओल्या दुष्काळात जात आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणावरदेखील पाणी फिरले. यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सर्वच संकटात सापडले आहे. अशा परीस्थितीत शासनाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे असल्याने प्रशासनाने सद्यस्थितीत तातडीने पंचनामे करावे अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
यावेळी नायब तहसीलदार अमित भोईटे, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, प्रभारी गटविकास अधिकारी सनेर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी जाधव, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.