पितरांच्या पिंडाना महागाईचा काकस्पर्श...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:29 AM2018-10-07T01:29:45+5:302018-10-07T01:32:51+5:30
पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे.
अजय कोतकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे. धर्मशास्त्रात जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या काळात विविध धार्मिक कार्यांना महत्व आहे.
एकेकाळी पितृपक्ष पंधरवडा म्हटला की, गावात दररोज घरोघरी पंगती उठायच्या. आजच्या धकाधकीच्या युगात केवळ घरच्या घरी पित्रे जेवू घालण्याची पद्धत वाढू लागल्याने पितृपक्षातील पंगती आता ग्रामीण असो वा शहरी भागात दुर्मिळ झाल्या आहेत.
भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो. या पंधरवड्यात हिंदूधर्मीय आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत असतात. आजपासून काही वर्षे अगोदरपर्यंत पितृपक्ष म्हटला की ग्रामीण भागात घरोघरी पंगती उठविल्या जायच्या. घरातील गृहिणी दिवसभर स्वयंपाकात व्यस्त असायच्या. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्ली पंगतींची एकच लगबग चालायची. वरण,भात, कढी वडे, अळूच्या पानांच्या वड्या, खीर व तीन चार प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचा पितरांचा खास मेनू असायचा आणि आजही आहे.
आजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एवढा स्वयंपाक करायचा कोणी हाही प्रश्न निर्माण झाल्याने आता घरच्या- घरी पितर ही पद्धत रुढ झाली आहे. पितृपक्षाला प्रारंभ होऊन एक आठवडा होत आला तरी पूर्वी असलेला जेवणावळीचा गलबला कुठेच ऐकू येत नाही. आज पितृपक्ष म्हणजे केवळ श्राद्ध घालण्याची औपचारिकता बनून राहिली आहे .
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढून अनेकजण ही प्रथा पाळताना दिसतात, पण गच्चीवर, कौलावर, पत्रावर ठेवण्यात येणाऱ्या पदार्थांना यंदा महागाईचा स्पर्श झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा खाली होताना दिसत आहे.
महागाईच्या काळात श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे
पितरांना जेवू घालताना साधारणत: दोन ते तीन हजारावर येणारा खर्च आज दुपटीने वाढला आहे. त्यामुळे श्राद्धाचे बजेट कसे सांभाळावे असा प्रश्न पडला आहे. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले असले तरी पारंपरिक पद्धतीने आपापल्या परीने श्राद्ध घालण्यात येत आहे