परमार्थ हाच खरा धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:05 PM2019-04-22T12:05:54+5:302019-04-22T12:06:23+5:30
भगवंतांनी धर्मासाठी स्वत:च्या इच्छेने क्षेत्र निर्माण केले. हे ब्राह्मंड निर्माण करताना भगवंतांनी मर्यादा राखून हे विश्व निर्माण केले. विश्व ...
भगवंतांनी धर्मासाठी स्वत:च्या इच्छेने क्षेत्र निर्माण केले. हे ब्राह्मंड निर्माण करताना भगवंतांनी मर्यादा राखून हे विश्व निर्माण केले. विश्व निर्माण करताना अधर्म कुठेही वाढणार नाही याची काळजी घेतली. जेव्हा वाटलं की अधर्म वाढतो आहे तेव्हा भगवंतांनी तो नष्ट करण्यासाठी पांडवासारख्या धर्मप्रिय व्यक्तींना धर्म वाढवण्यासाठी उत्तेजित केले. त्यांचे हातून धर्मकार्य करून घेतले. कुळधर्म वंश परंपरेने चालत येतात. कुळधर्म नाहीसे झाले तर कुळाचा नाश होतो.
धर्माचा नाश झाला तर कुळात पाप वाढीस लागते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत उपदेश करताना सांगतात की, पाप अधिक वाढले, संसारातील जडण-घडण बिघडले तर त्यामुळे वर्णव्यवस्था नाश पावते. वर्णसंकट कुळाचा नाश करणारांना नरकात नेते. कारण श्राद्ध, तर्पण जर केले नाही तर त्याला मुकलेले पूर्वज, पितर हे अधोगतीला जातात. त्यामुळे वर्णसंकट करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात.
मनुष्य प्राणी बुद्धिमान असूनही सुखासाठी एकमेकांना मारण्यास तयार होतो. ही खेदाची गोष्ट आहे. परंतु धैर्यवान पुरुषाला मोह निर्माण होत नाही. सुख -दु:ख समान मानणाºया धीर पुरुषाला कोणताही मोह न झाल्यामुळेच भगवंताचे तत्त्व जाणून तो सत्प्रवृत्त होतो. जे निर्माण झाले आहे ते नाश पावणार आहे हे ज्याला समजलं तो आपले जीवन सत्कारणी लावण्यासाठी अविनाशी शक्तीला शरण जातो. जन्माला येण्यास जसा काळवेळ नाही तसेच मृत्यूला देखील वेळ काळ नाही. अधर्म वाढल्यानंतरच धर्मयुद्ध करण्यासाठी कुणीतरी जन्माला येतो. धर्मयुद्ध झाले नाही तर स्वधर्म आणि कीर्ती याचा नाश होऊन ब्रह्मांडात हाहा:कार माजेल, धर्मयुद्ध हे प्रत्येकाचे कर्मयुद्ध आहे. कर्म बंधन तोडून धर्म युद्धाचे साधनाचा अंगीकार केल्यास कोणतेही भय राहत नाही. ईश्वरी संकेत जाणणाºया व्यक्तीला मोठा पाण्याचा साठा मिळाला तरी ग्लासभर पाण्याची जेवढी गरज आहे, तेवढीच गरज ब्रह्म जाणणाºया व्यक्तीला वेद शास्त्रांची आहे. परमार्थाच्या मार्गात वेदशास्त्र नसेल तर परमार्थाच्या अर्थाला महत्त्व राहणार नाही. परमार्थाच्या मार्गावर जाणे हाच मनुष्य प्राण्याचा खरा धर्म आहे.
- नाना महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.