पालकांनो तयारीत रहा, बुधवारी निघणार शाळा प्रवेशाची सोडत!
By अमित महाबळ | Published: April 4, 2023 05:53 PM2023-04-04T17:53:54+5:302023-04-04T17:54:33+5:30
शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत (आरटीई) शाळांमधील २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी (दि.५) राज्यस्तरावरील सोडत
जळगाव :
शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत (आरटीई) शाळांमधील २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी (दि.५) राज्यस्तरावरील सोडत काढली जाणार आहे. शिक्षण आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे ही सोडत निघेल. जळगाव जिल्ह्यात २८२ शाळांमधील ३१२२ जागांसाठी ११,२९० अर्ज दाखल आहेत. एका जागेसाठी सरासरी तीन अर्ज आहेत.
राज्यस्तरावर ऑनलाइन सोडत निघाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवले जाणार आहेत. त्याच वेळेस अर्जदारांची माहिती शाळांच्या लॉगइनला, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा कार्यालय आणि तालुका कार्यालय यांच्याकडे उपलब्ध करून दिली जाईल. मेसेज पाठविले जाणार असेल, तरी पालकांनी राज्यस्तरीय लॉटरीनंतर त्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत वा अपात्र याची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावरून घेत राहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यस्तरावर सोडत काढल्यानंतर प्रवेशासाठी पात्र अर्जदारांनी संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करायचा आहे. जे विद्यार्थी निवड होऊनही प्रवेश घेणार नाहीत, त्यांच्या ऐवजी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
पडताळणीत २७ अर्ज बाद
जळगाव जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ११,३१७ अर्ज आले होते. त्यांच्या पडताळणीत २७ अर्ज दोनदा केले असल्याचे आढळून आले. त्यामुळे ते बाद करण्यात आले आहेत.