पालक आर्थिक अडचणीत ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:30+5:302021-06-03T04:12:30+5:30
अभाविपचे विविध महाविद्यालयांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला तर अनेकांचा रोजगार बुडाला. परिणामी, ...
अभाविपचे विविध महाविद्यालयांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला तर अनेकांचा रोजगार बुडाला. परिणामी, पालक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकत असताना, त्यात पाल्याचे शैक्षणिक शुल्क कसे भरणार ही चिंता आता पालकांना सतावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी शहरातील विविध महाविद्यालयांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या शिष्टमंडळाने आय.एम.आर. महाविद्यालय, रायसोनी महाविद्यालय, एस.एस.बी.टी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेतली. नंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या प्राचार्यांसमोर मांडल्या. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन व आर्थिक स्थिती विस्कळीत झालेली आहे. याचा परिणाम पालकांच्या रोजगार व उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाठ शैक्षणिक शुल्क पालकवर्ग शाळा व महाविद्यालयांना देण्यास सक्षम नाही. कोविडमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. शाळा व सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे व ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही, अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अडचणी मांडल्यानंतर स्वीकारले निवेदन
आय.एम.आर. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयीन शुल्कात कपात करून महाविद्यालय चालवायचे कसे, असा प्रश्न विचारत कुठलीही कपात करणे शक्य नाही, असे विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांनी संपूर्ण अडचणी प्राचार्यांना सांगितल्या. काहींना अश्रू अनावर झाले. त्यानंतर प्राचार्यांनी निवेदन स्वीकारले. कुठलाही विद्यार्थी महाविद्यालयीन शुल्कामुळे परीक्षेपासून वंचित राहता कामा नाही, अशी मागणी अभाविप महानगर मंत्री आदेश पाटील यांनी महाविद्यालयाकडे केली.
रायसोनीने केले पन्नास टक्के कपात
रायसोनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतल्यानंतर परीक्षा शुल्कात पन्नास टक्के शुल्क माफ केल्याची माहिती अभाविपला देण्यात आली. या निर्णयाचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. तसेच कोविडमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या परिवारातील सदस्य दगावले असतील. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, तसेच सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून याअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करावे, अशीही मागणी करण्यात आली. महाविद्यालयांना निवेदन देताना, अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, नगर मंत्री आदित्य नायर, संकेत सोनवणे, अभिषेक खोपुल, दीपक बाविस्कर, यश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.