बालिकेस पालक रुग्णालयात सोडून गेल्याने पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:38 PM2018-12-28T12:38:21+5:302018-12-28T12:39:03+5:30
रडणाऱ्या बालिकेचा परिचारिकांनी केला संभाळ
जळगाव : चार वर्षीय बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोडून पालक घरी निघून गेल्याने रुग्णालयात चांगलीच पळापळ झाल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी घडला. अखेर संध्याकाळी हे पालक परतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. या दरम्यान तब्बल तीन तास रडणाºया या बालिकेचा परिचारिकांनी संभाळ केला व पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पालक परतल्याने या प्रकरणास पूर्णविराम मिळाला.
गुुरुवारी दुपारी १.१० वाजता नंदा संजय पाटील (४, रा. रायपूर, ता. जळगाव) या बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बालिकेवर बाल रुग्ण कक्षात (वॉर्ड क्रमांक ४) उपचार सुरू करण्यात आले. मात्र या दरम्यान दुपारी चार वाजेच्या सुमारास बालिकेचे पालक रुग्णालयातून निघून गेले.
रुग्णालयात बालिका रडत आहे तरी पालक का लक्ष देत नाही, या बाबत परिचारिकांनी चौकशी केली असता बालिकेचे पालक कोठेच आढळून आले नाही. रुग्णालयात पालकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसादही मिळत नव्हता. त्यामुळे बालिकेला सोडून पालकांनी पलायन केल्याचा कयासही लावला जात होता. अखेर पावणे सात वाजेच्या सुमारास या बाबत पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू असतानाच सात वाजेच्या सुमारास पालक पुन्हा रुग्णालयात अवतरले व सर्वांना दिलासा मिळाला.
सदर कुटुंबास सुरत येथे जायचे असल्याने ते घरी पैसे घेण्यासाठी गेले होते, असे सांगण्यात येत होते. मात्र एवढ्या लहान मुलीला रुग्णालयात एकटे सोडून गेल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात होते.