चोपड्यात उर्दू शाळेला पालकांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:29 PM2019-11-29T22:29:44+5:302019-11-29T22:29:49+5:30
शिक्षणाचा बट्टयाबोळ झाल्याने पालकांचा संताप : सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक नाही
चोपडा : शहरातील दर्गा अली भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दु कन्या शाळा क्रमांक १ मध्ये शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून प्रभारी मुख्याध्यापिका शाळेत येत नसल्याने शाळा वाऱ्यावर आहे. तसेच इयत्ता पहिली ते सातवी अशा सात वर्गांना केवळ तीनच शिक्षक सध्या असल्याने मुलींना शिकवायला कोणीही जात नाही. आदी कारणांनी संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या शाळेला कुलूप ठोकले.
याबाबत वृत्त असे की, दर्गा अली परिसरात उर्दु कन्या शाळा क्रमांक १ मध्ये एकूण विद्यार्थिनींची संख्या २०५ एवढी आहे. पहिली मध्ये १९ विद्याथीर्नी, दुसरी मध्ये २० , तिसरी मध्ये ३०, चौथीमध्ये ३७, पाचवीमध्ये ३२, सहावीमध्ये ३३ तर सातवीमध्ये ३४ विद्यार्थीनी आहेत. मात्र जुलै महिन्यापासून प्रभारी मुख्याध्यापिका लतिफा पठाण या शाळेतच येत नसल्याने शाळा जणू वाºयावरच झाली आहे. गेल्यावर्षी जून पासून त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा भार आहे. वास्तविक ही अतिशय जुनी शाळा आहे.५२ वषार्पासून ही शाळा सुरू आहे. सध्या शिक्षण विभागाकडे प्रभारी मुख्याध्यापिका पठाण यांनी १४ नोव्हेंबर रोजी जीवितास धोका असल्याचा अर्ज दिला आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांनी २३ नोव्हेंबर रोजी त्यांची बदली केल्याचे आदेश पारित केले आहे. शहरातील उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये त्यांची बदली झालेली आहे. मात्र यापूर्वी २४ जुलैपासून तर २३ नोव्हेंबरपर्यंत या कुठे होत्या, हजेरी पत्रावर त्यांची स्वाक्षरी त्या काळात दिसत नाही. तरीही त्यांचा पगार मात्र निघत होता. अखेर विद्यार्थिनींचे नुकसान होत असल्याचे पाहून संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.
विद्यार्थिनींना अजूनही
गणवेश नाही
संतप्त पालकांनी दिलेली माहिती अशी की, शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारा गणवेश सुद्धा यंदा अद्याप मिळालेला नाही. या शाळेत शिक्षकांमध्ये प्रभार घेण्याच्या वादावरूनच शाळेचे वाटोळे झाल्याचे दिसत आहे. शासनाचा सेवाज्येष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक पदाचा पदभार द्यावा असा आदेश असून संबंधित सेवाज्येष्ठ शिक्षकानी पदभार घेतला नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचाही आदेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून प्रभारी मुख्याध्यापिका यांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप पालकांनीही प्रतिनिधीशी बोलताना केला.
याबाबतीत येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्या कामानिमित्त बैठकीसाठी बाहेर होत्या. त्यामुळे अधिक माहिती समजू शकली नाही.
कुलूप ठोकणाºया पालकांमध्ये शबाना बी मुस्तफा खान, साबेरा आपा, गुलशन बी, जायदा बी शेख एजाज, नीलोफर जहा, शगुफ्ता बी सय्यद जफर, फरसाना बी शेख साजिद, नाजिया बी शेख जावेद, रीहाना बी, हिना बी, शकील अहमद गुलाम रसूल शेख, सय्यद जाफर सय्यद हनीफ, अकील अहमद गुलाम गैस, जावेद अहमद गुलाम गैस, शबाना मुस्ताक अली खान, जमील शेख गफूर, अखिल शेख जाबिद यांचा समावेश होता.
... आणि संतप्त पालक धडकले पंचायत समितीमध्ये
संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पंचायत समितीवर मोर्चा नेला होता. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त पालकांनी आपला मोर्चा शिक्षण विस्तार अधिकारी एस. जी. गजरे यांच्याकडे वळविला व त्यांना गाºहाणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे ही शाळा येत नसल्याने याबाबतीत मी काहीही बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितले. यापूर्वी संबंधित शाळेतील शिक्षकांची या व इतर कारणावरून चौकशी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन शिक्षक आणि सात वर्ग
या शाळेमध्ये विद्यार्थिनीच्या संख्येनुसार ग्रेडेड मुख्याध्यापकाचे पद असताना ते रिक्त आहे. त्याचा पदभार इतर जेष्ठ शिक्षकांकडे सोपविला जात आहे. एक ग्रेडेड मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक आणि पाच शिक्षक अशी संख्या या शाळेत असणे गरजेचे असताना सध्या केवळ तीनच शिक्षक या शाळेत सात वर्गातील विद्यार्थिनींना शिकवीत आहेत. तीन शिक्षक सात वर्ग कसे चालवतील? हा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे.