पालकांनो, पोस्ट कोविडच्या मुलांना जपा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:19+5:302021-08-29T04:19:19+5:30
जळगाव : यंदाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलेदेखील बांधित झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही मुले ठणठणीत झाली असली तरी, बदलत्या ...
जळगाव : यंदाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलेदेखील बांधित झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही मुले ठणठणीत झाली असली तरी, बदलत्या हवामानानुसार या मुलांंमध्ये सर्दी, खोकला, ताप, धाप लागणे आदी प्रकारचे लक्षणे दिसून येत आहेत. शहरातील विविध बाल रूग्णालयांमध्ये अशा प्रकारचे रूग्ण आढळून येत आहेत. पालकांनी कोरोनातून बरे झालेल्या मुलांना जपण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचे लक्षणे दिसल्यास, तात्काळ डॉक्टरांना दाखविण्याचे सुचविले जात आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरातील विविध बालरोग तज्ञांकडे उपचारासाठी बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्या मुलांमध्ये पुन्हा कोरोना सारखी लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे पालंकाना काहीशी भीती वाटत असली तरी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या मुलांच्या करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्या निगेटीव्ह येत आहेत. १५ वर्ष वयोगटातील कोरोना होऊन गेलेल्या बहुतांश मुलांमध्ये बदलत्या हवामानानुसार सर्दी, खोकला, ताप, धाप लागणे आदी प्रकारचे लक्षणे आढळून येत आहे. मात्र पालकांनी कुठल्याही प्रकारे घाबरण्याचे कारण नाही. लक्षणे दिसताच मुलांवर तात्काळ उपचार केल्यावर, ही मुले दोन ते तीन दिवसात बरे होत असल्याचे बालरोग तज्ञांनी सांगितले.
इन्फो :
१५ वर्षाखालील पाच हजार मुले पॉझिटिव्ह
- कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान बालकांनाही कोरोनाची बाधा दिसून आली. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील बालकांची संख्या मोठी होती.
- जळगाव जिल्ह्यात १५ फेब्रुवारीनंतर सुरू झालेल्या लाटेत, ४ हजार ९१६ बालके आढळून आली आहेत.
- तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३ हजार ८७२ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती.
- कोरोना झालेल्या बालकांवर उपचारासाठी पालकांनी सरकारी रूग्णालयांपेक्षा खाजगी रूग्णांलयाकडे धाव घेतल्याचे दिसून आले.
इन्फो :
या लक्षणांकडे लक्ष असू द्या
- सतत खोकला येणे, ताप येणे, धाप लागणे, जोराने श्वास घेणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे कोरोना झालेल्या बालकांमध्ये आढळून येत आहेत. ही लक्षणे प्राथमिक उपचारानंतरही कायम राहिल्यास डॉक्टरांतर्फे कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
इन्फो :
कोरोना होऊन गेेलेल्या बालकांमध्ये आता खोकला येणे, ताप येणे, धाप लागणे आदी प्रकारचे लक्षणे आढळून येत आहेत. उपचारानंतरही दोन ते तीन दिवसांत या मुलांना बरेदेखील वाटत आहेत. मात्र, आतापर्यंत अशा प्रकारची लक्षणे असल्यावर कुणीही कोरोनाबाधित मुलगा आढळून आलेला नाही. त्यामुळे पालकांनी घाबरायचे कारण नाही.
डॉ. गौरव महाजन, बालरोग तज्ञ.
बदलत्या हवामानानुसार बालकांमध्ये आता खोकला येणे, ताप येणे, धाप लागणे, जुलाब होणे, ही सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येते. मात्र, पालकांनी तात्काळ उपचार करून घेतले तर, दोन ते तीन दिवसांत मुले बरे होतात. परंतु, हीच लक्षणे जास्त काळ राहिली तर, पालकांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या तात्काळ करून, पुढील उपचार करावेत.
डॉ. राहुल पाटील, बालरोग तज्ञ