पालकांनो लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:07+5:302021-04-05T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, दुसऱ्या लाटेत लहान मुले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, दुसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात शून्य ते २० वर्षांपर्यंतच्या वयोगटात दोनच महिन्यात ९९८ मुले, तरुण बाधित झाली आहेत. गंभीर बाब म्हणजे यंदा नवजात बालकांमध्येही गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. जी या आधी आढळली नव्हती. एकत्रित राज्यातच ही परिस्थिती असून, जिल्ह्यातही बालके बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
१५ फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. मार्च महिन्यात यात झपाट्याने कोरोनाचा संसर्ग समोर आला. या संसर्गातून कोणत्याच वयोगटाच्या व्यक्ती सुटलेल्या नाहीत. शिवाय मृतांमध्ये तरुणांची संख्या वाढत असल्याचे गंभीर चित्र गेल्या महिनभरात समोर आले आहे. नवजात बालकांवर उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यात सुरुवातीपासून काही नवजात बालकेही बाधित आढळून आले आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोना होणार नाही, अशा गैरसमजात पालकांनी न राहता, मुलांना जपावे, असे आवाहन बालरोगतज्ञांनी केले आहे. शिवाय सध्या कुटुंबच्या कुटुंब बाधित होण्याचेही प्रमाण वाढले आहे.
मार्चमध्ये प्रमाण वाढले
दीड महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट धडकली असून, यात मार्च महिन्यात लहान मुले व तरुण बाधित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. मार्च महिन्यातच एकत्रित रुग्णसंख्येचाही उच्चांक नोंदविण्यात आला होता. त्यातच जीएमसीत तीन नवजात बाळांना बाधित म्हणूनही सुरुवातीला दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या दीड महिन्यातच हे प्रमाण प्रचंड वाढल्याचे चित्र आहे.
दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू
अमळनेर तालुक्यातील एका दोन वर्षीय बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शासकीय दरबारी होताच मोठी खळबळ उडाली होती. या बाळाला गंभीर न्यूमोनिया झाला होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह व दुसरा अहवाल बाधित आढळून आला होता. खासगी उपचार केल्यानंतर गंभीर अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बाळांनाही गंभीर लक्षणे येत असून एका नवजात बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. सुदैवाने या बाळाला वाचविण्यात यंत्रणेला यश आले.
फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत बाधित
० ते १० वयोगट : २२६
१० ते २० वयेागट : ७७२
कोट
बाळांमध्ये गंभीर लक्षणे नसतात हा गैरसमज आहे. संशयित बाळांची तातडीने, प्राधान्याने आणि वेळेवर तपासणी करून घ्यायला हवी. दुसरी लाट सुरू आहे. कोणत्याही अफवांना न घाबरता त्वरित उपचारासाठी चांगल्या वैद्यकीय संस्थेमध्ये ताबडतोब संपर्क केला पाहिजे. बाळांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येत असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. -डॉ. बाळासाहेब सुरोसे, बालरोग विभाग