परिहार भावंडाचा अटकपूर्व फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:26+5:302021-02-06T04:27:26+5:30
जळगाव : शैक्षणिक संस्थेविषयीच्या वाद प्रकरणी सिग्नटे फाउंडेशन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनीष रमेश कथुरिया (रा.मेहरुण तलाव) यांना घरात ...
जळगाव : शैक्षणिक संस्थेविषयीच्या वाद प्रकरणी सिग्नटे फाउंडेशन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनीष रमेश कथुरिया (रा.मेहरुण तलाव) यांना घरात घुसून मारहाण केली व कॅमेराचा डिव्हीआर, इतर साहित्य लुटून नेल्याच्या प्रकरणात दिशा अकादमीचे संचालक विकास मनिलाल बहादुरसिंग परिहार व संजय मनिलाल बहादुरसिंग परिहार (रा.गणेश कॉलनीजवळ) या दोघांसह इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल केला होता. यावर कामकाज करताना न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला व संस्थेच्या कार्यकारिणीत कुटुंबातील सदस्यांनाच घेतल्याबाबत पोलीस व संशयितांना फटकारले आहे.
धनादेश अनादर प्रकरणी ३० लाखाचा दंड
जळगाव : व्यावसायिक कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेडसाठी दिलेला २७ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा धनादेश अनादर झाल्याच्या प्रकरणात रामभाऊ फकिरा पाटील (रा.चाळीसगाव) यांना चाळीसगाव न्यायालयाने धनादेश रकमेसह २० लाख रुपयांचा दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम फायनान्स कंपनीला देण्याचे आदेश दिले आहे. न्या.एम.व्ही.भागवत यांनी हा निकाल दिला. फायनान्स कंपनीतर्फे ॲड. संदीप सोनवणे यांनी काम पाहिले.
खोटी साक्ष दिली म्हणून शिक्षा
जळगाव : न्यायालयात खोटी साक्ष दिली म्हणून अमनसिंग पवार यांना रावेर न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. या प्रकरणात खोटी साक्ष दिल्याचेही पवार यांनी मान्य केले. रावेर येथील मारहाणीच्या गुन्ह्यात खटला चालवितांना न्या.आर.एल.राठोड यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे ॲड.ए.के.शेख यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मूर्ती चोरीबाबत तक्रार
जळगाव : मारुती पेठेतील श्री हिंगलाज माता मंदिर गाभाऱ्यातील पितळी देवांच्या मूर्तीची चोरी झाल्याच्या सोशल मीडियावर प्रसारीत होत असलेल्या माहितीबाबत संस्थेचे अध्यक्ष अशोक खंडूलाल भावसार यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.