पारोळ्याचा भुईकोट किल्ला गतवैभवाच्या प्रतिक्षेत
By admin | Published: April 6, 2017 03:55 PM2017-04-06T15:55:24+5:302017-04-06T16:01:41+5:30
भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मिळाला आहे, मात्र निधीचा वापर होवून देखील किल्ल्याची स्थिती आहे, तशीच आहे.
Next
>ऑनलाईन लोकमत/रावसाहेब भोसले
पारोळा,दि.6- ऐतिहासिक वारसा लाभलेला भुईकोट किल्ला जीर्ण झाला आहे. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मिळाला आहे, मात्र निधीचा वापर होवून देखील किल्ल्याची स्थिती आहे, तशीच आहे. इतिहासाचा हा ठेवा जपून त्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.
शहरात मुख्य बाजारपेठेला लागून असलेला भुईकोट किल्ला म्हणजे वास्तु शास्त्राचा सुंदर नमुना आहे. किल्ल्याच्या सभोवती चौफेर तटबंदी आहे. या तटबंदीत पाण्याचा खंदक आणि पाण्याचा स्त्रोत आजदेखील आहे. एका बाजुला या खंदकात पाणी आहे. जिवंत पाण्याच्या सात विहिरी आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक महल आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारी सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार आहे. पूर्वी सकाळी व सायंकाळी दरवाजा उघडणे अथवा बंद करण्यासाठी हत्तीचा वापर होत असल्याचे जाणकार सांगतात.
परंतु या ऐतिहासिक वास्तुची दुरवस्था झालेली आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारी प्रचंड दरुगधी असते. पुरातत्व विभागाने गड किल्ले सुशोभिकरण अंतर्गत भुईकोट किल्ल्याचा समावेश केला. त्या अंतर्गत अडीच कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. या निधीतून किल्ल्यातील साफसफाई करणे, ढासाळलेला बुरूज दुरुस्ती, तटबंदीची दुरूस्ती, अंतर्गत प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे, जॉगिंग ट्रॅक करणे आदी कामे झालीत. दीड ते पावणेदोन कोटीचा निधी खर्ची करूनही कामे झालेत की असे चित्र पाहाण्यास मिळत नाही.
किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च होवून देखील समाधान होत नाही. आजही किल्ला आहे, त्या स्थितीत आहे. ढासाळलेले बुरुज दुरुस्ती होवून देखील परिस्थिती वेगळी नाही. ट्रॅक उखडलेला आहे, त्यावर मोठमोठे गवत आहे. या ट्रॅकचा उपयोग काही जण शौचास बसण्यासाठी करतात, अशी स्थिती आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने वास्तु संरक्षणासाठी अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे फलक लावण्यात आले होते. परंतु ते सुचना फलकच किल्ल्याच्या परिसरातून गायब झाले आहेत.
या किल्ल्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कोटय़ावधीचा निधी खर्च केला गेला पण त्या सुरक्षतेच्या दृष्टीने आजदेखील कोणतेही प्रयत्न झालेले नाही. या किल्ल्याच्या सभोवती दुकानदारानी केलेले अतिक्रमण हे ऐतिहासिक वास्तुच्या ‘पाऊल खुणा’ पुसण्याच्या प्रयत्न करीत आहेत. किल्ल्याच्या सभोवती चौफेर अतिक्रमण झाल्याने यात किल्ला लुप्त होत आहे. शहरातील या एकमेव ऐतिहासिक वास्तुचे जतन आणि संवर्धनासाठी कठोर पाऊले राज्य शासन आणि पुरातन विभागाकडून उचलणे आवश्यक आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजही दिल्ली दरवाज्याच्या नावाने ओळखला जातो. परंतु या दरवाज्याच्या कमानीसह कडा कोसळल्या आहेत. हा दरवाजादेखील अतिक्रमणाचा गर्तेत अडकला आहे. आणि किल्लाचा दिल्ली दरवाजा नामशेष झाला आहे.
289 वर्षापूर्वीचा किल्ला
सपाट मैदानावरील हा किल्ला इ.स.1727 मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. 525 फूट लांब व 435 फुट रूंद असलेल्या या किल्याच्या सर्व बाजुने पाण्याचे खंदक असून पूर्वेस मोठा तलाव आहे. किल्याच्या सभोवती दगड-चुन्याने बांधलेला एक व आतील बाजुस दुसरा तट आहे. पूर्वी या किल्याचे शिल्प, सौंदर्य पहाण्यासाठी परदेशी पर्यटक येत. पण किल्याची दुरवस्था पाहून परदेशी पाहुणे येणे बंद झाले.