पारोळा बस स्थानक खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:10 PM2019-07-06T21:10:44+5:302019-07-06T21:10:56+5:30
पारोळा : पहिल्याच पावसात येथील बस स्थानकात चिखलाचे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरण वेळीच न केल्यामुळे बस स्थानक ...
पारोळा : पहिल्याच पावसात येथील बस स्थानकात चिखलाचे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरण वेळीच न केल्यामुळे बस स्थानक खड्डेमय होऊन स्थानकाची दुरवस्था झाली आहे. याचा एसटीसह प्रवाशांना त्रास होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पारोळा शहरात दमदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने संपूर्ण बस स्थानक चिखलमय झाले आहे. स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ मोठे मोठे खड्डे पडल्याने चिखलाच्या खड्ड्यात बस बसस्थानक अडकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना चिखलाचा सामना करून आत शिरावे लागते. गेल्या दहा वर्षांपासून येथे डांबरीकरण झालेले नाही. परिणामी या ठिकाणी उन्हाळ्यात मातीचा धुरळा व पावसाळ्यात चिखलाचा सामना प्रवाशांना करावा लागतो. याबाबत प्रवासी संघटनेने अनेकदा निवेदने देऊन बस स्थानकावर डांबरीकरणाची मागणी केली आहे. परंतु, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षाने स्थानकाची दुर्दशा झाली आहे.या खड्ड्यांमुळे चालकांनादेखील बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बसस्थानकावर सकाळी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. ग्रमीण भागातून येणारे शालेय विद्यार्थी खड्ड्यात पायच घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही येथील चढउताराच्या जागेवरून चालताना त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळा जवळ येताच नागरिकांतून येथील कामांबाबत प्रशासनाकडे मागणी केली जाते. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींकडेही स्थानक सुशोभीकरणाबाबत नागरिकांनी मागणी केली होती.
चालक, प्रवासी यांचेच होणारे हाल पाहता डांबरीकरणाच्या कामासह इतरत समस्यांकडे लक्ष देऊन स्थानक सुशोभित करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.