दिलासादायक : पारोळ्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 10:27 PM2021-04-26T22:27:57+5:302021-04-26T22:28:16+5:30
पारोळा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यात दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात छुपा शिरकाव करीत रुग्ण संख्येत पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट वेगाने वाढविला आहे. यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी झाली आहे. रुग्ण बरा होण्याचा दर देखील वाढला असल्याने सर्वाना दिलासा देणारी बाब आहे.
तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४ हजार १९९ एवढी आहे.त्यात शहरी भागात १ हजार ५४२ तर ग्रामीण भागात २ हजार ६५७ एवढी आहे. यात एकूण बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांनाची संख्या ३ हजार ८४६ आहे. शहरी भागात १ हजार ४६७ व ग्रामीण भागात २ हजार ३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार घेणारे ३०० रुग्ण आहेत. शहरातील ५० व ग्रामीण भागातील २५० आहे. शहरात २५ व ग्रामीण भागात २८ असे ५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बरा होण्याचा दर बऱ्यापैकी वाढला आहे. संचारबंदीत घेतलेले ठोस निर्णय किराणा दुकानांच्या वेळेत केलेला बदल अनावश्यक बंद ठेवलेली दुकाने, पालिका व पोलीस प्रशासनाने राबविलेले कारवाई चे सत्र यामुळे हे शक्य झाले आहे. नागरिकांनी स्वतःच्या काळजी सोबत कुटुंब व समाजाची काळजी घेतली तर कोरोनावर मात मिळविण्यास वेळ लागणार नाही. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे या गोष्टी जर पाळल्यात कोरोना वर नक्की विजय मिळविला येईल.
संसर्ग फैलावास आळा कसा बसला?
दररोज ८००ते ९०० लोकांची सतत तपासणी करण्यात येत असल्याने ही चेन ब्रेक होण्यास मदत झाली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लग्न कार्य व अंत्यविधी यासाठी होणाऱ्या गर्दी वर रोक बसविण्यात प्रशासनाला यश आले. संचारबंदीत लग्न कार्य थांबले. जे लग्न कार्य झाले, ते मोजक्या जणांच्या उपस्थितीत पार पडले. यामुळेही संसर्ग फैलावास आळा बसला. शहरातही रिकामटेकडे फिरणाऱ्या लोकांची जागेवर अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आल्याने विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली.