बोरखेडे शिवारात बिबट्याने फस्त केले पारडू आणि वासरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 08:06 PM2018-07-08T20:06:33+5:302018-07-08T20:07:05+5:30
सलग दोन दिवस टिपले सावज, परिसरात भीतीचा थरार
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव शहराच्या पूर्वेला अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरखेडे बुद्रूक शिवारात बिबट्याने शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस म्हैस व गायीच्या पारडू आणि वासरूवर हल्ला करुन त्यांना ठार केले. वनविभागाने शोध मोहीम केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. लवकरच या परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे वनसंरक्षक संजय मोरे यांनी दिली.
बोरखेडे शिवारात शनिवारी पहाटे बिबाट्याच्या हल्ल्यात म्हशीचे ठार झालेले पारडू आढळून आले. हिस्त्र प्राण्याचा हल्ला असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाला कळविले गेले. रविवारी पहाटे सुभाष चिंधू पाटील यांच्या शेतातील गायीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला ठार केले.
वनविभागाच्या कर्मचाºयांनी परिसरात शोधमोहीम केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. याभागात तत्काळ पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव पाठविला असल्याचेही मोरे यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाने रविवारी परिसरात बिबट्यापासून घ्यावयाची काळजी याची पत्रके वाटली. नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहनही केले.
‘बिबट्या’चे कमबॅक आणि भीती
नोव्हेंबर महिन्यात वरखेडे शिवारात बिबट्याने तळ ठोकून पाच मानवी जीव घेत अनेक पाळीव प्राण्यांनाही ठार केले होते. खासगी शुटर्सव्दारा बिबट्याचा खात्मा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. पुन्हा नऊ महिन्यांनी बोरखेडे शिवारात बिबट्याने शिकार करुन आपण आल्याची एकप्रकारे वर्दी दिली असून परिसरातील नागरिक, शेतकरी कमालीचे भयभीत झाले आहेत. सद्यस्थितीत पावसाची संततधार सुरू असल्याने शेतात लगबग आहे. बिबट्याचा परिसरात वावर असल्याचे लक्षात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.