प्रवाशी चोरट्याने पळविली कार
By admin | Published: March 5, 2017 12:03 AM2017-03-05T00:03:31+5:302017-03-05T00:03:31+5:30
जळके गावाजवळ दुसरी घटना : भुसावळचे नाव सांगून मुंबईहून भाड्याने आणली कार
जळगाव : भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून एका चोरट्याने मुंबई येथून कार भाड्याने घेतली व जळके गावाजवळ लघु शंकेला थांबला असता तेथे मोबाईल पडल्याचा बहाणा करीत चालकाला मोबाईल घेण्यास खाली उतरवून कार घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता जळके गावाजवळ घडली. दोन महिन्यांपूर्वी जळके गावाजवळ अशीच घटना घडली होती. सलग दुसºयांदा घटना घडल्याने खळबळ उडालीआहे.
आरडाओरड करुनही उपयोग नाही
प्रवाशी म्हणून आलेल्या चोरट्याने कार पळविल्याचे लक्षात आल्यानंतर दास यांनी आरडाओरड केली, मात्र पहाटेच्या सुमारास रस्त्यावर कोणीच नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी जळके गावाजवळ येवून ग्रामस्थांच्या मदतीने दास यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून उपनिरीक्षक एन.बी. सूर्यवंशी व रतिलाल पवार यांच्याकडे हकीकत कथन केली. या गाडीची किंमत चार लाख रुपये असल्याचे दास यांनी सांगितले. कारसह दोन मोबाईलही त्याने लांबविले आहेत.
लघु शंकेला थांबला अन् मोबाईल पडल्याचा बहाणा करीत चालकाला दिला चकवा
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विक्रम धिरेंद्र दास (वय ४० रा.भार्इंदर, जि.पालघर) यांचा टॅक्सी टुरीस्टचा व्यवसाय आहे. १ मार्च रोजी एका व्यक्तीने फोन करुन भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून कार बुक केली. त्यानुसार ३ मार्च रोजी रात्री ९ वाजता विक्रम दास हे कारसह (क्र.एम.एच.०२ सी.आर.१८८७) कल्याण-भिवंडी नाका येथे पोहचले.
तेथून संबंधित व्यक्तीला घेवून ते भुसावळकडे रवाना झाले. पुढे नाशिक शहराजवळ कारमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर दास हे मालेगावजवळ एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले, मात्र चोरटा कारच्या खाली उतरला नाही. जेवण आटोपल्यानंतर धुळे, एरंडोल व म्हसावदमार्गे येत असताना जळके गावाजवळ लालू वंजारी यांच्या शेताजवळ चोरट्याने लघुशंकेसाठी कार थांबवली.
लघुशंकेनंतर पुन्हा तो कारमध्ये बसला व शंभर फुटाजवळ कार नेल्यानंतर कारमध्ये बसताना बाटली व मोबाईल पडला आहे असे सांगून पुन्हा कार थांबविली व त्या वस्तू घेण्यास दास यांनाच पाठविले. दास हे तिकडे जायला निघताच चोरट्याने कार पळविली. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी मागील गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढायला सुरुवात केली आहे.
आरोपी व ठिकाण एकच
गेल्या दोन महिन्यापूर्वी जळके गावाजवळ अशीच घटना घडली होती. तेव्हाही चोरट्याने जामनेरला जायचे आहे असे सांगून मुंबई येथून कार भाड्याने आणली होती व त्याच जागेवरच लघुशंकेसाठी थांबवून कार घेवून पळ काढला होता. गुन्ह्णाची पध्दत पाहता या घटनेतही तोच आरोपी असल्याची शक्यता उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांनी वर्तविली आहे.उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सूर्यवंशी यांच्याकडून मागील गुन्हा व आताचा गुन्हा याबाबत माहिती जाणून घेत तपासाबाबत सूचना केल्या.