मेमूच्या पहिल्या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:06+5:302021-04-18T04:15:06+5:30
भुसावळ ते पुणे : संचारबंदीचा एसटी पाठोपाठ रेल्वेलाही फटका लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे ...
भुसावळ ते पुणे : संचारबंदीचा एसटी पाठोपाठ रेल्वेलाही फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे १५ एप्रिल रोजी भुसावळ ते पुणेदरम्यान सोडण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या पहिल्या विशेष फेरीला प्रवाशांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने, परिणामी या गाडीच्या प्रवासी संख्येवर परिणाम होऊन, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
कोरोनामुळे भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर बंद असल्या तरी, भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजरप्रमाणे बहुतांश स्टेशनवर थांबा असलेली, हुतात्मा एक्स्प्रेसच्या जागी १५ एप्रिल रोजी मेमू ट्रेनची विशेष फेरी सोडण्यात आली होती. १५ रोजी सकाळी सव्वासहा वाजता ही गाडी भुसावळहून पुण्याकडे रवाना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या गाडीलाही तिकीट आरक्षण सक्तीचे केले होते. मात्र, या गाडीच्या पहिल्याच फेरीच्या दिवशी भुसावळ रेल्वे स्टेशनवरून अगदी बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांनी आरक्षण केले, तर जळगाव स्टेशनवरही हीच परिस्थिती होती. मात्र, या गाडीला भुसावळ व जळगाववरून किती प्रवाशांनी आरक्षण केले आणि यातून रेल्वेला किती उत्पन्न मिळाले याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली नाही. मात्र, संचारबंदीच्या पहिल्या दिवसाचा या गाडीच्या प्रवासी संख्येवरही परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
आता दुसरी फेरी २९ एप्रिलला
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे मेमू ट्रेनच्या भुसावळ ते पुणेदरम्यानच्या एप्रिल महिन्यात १५ व २९ एप्रिल रोजी अशा दोनच विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. नुकतीच १५ एप्रिल रोजी पहिली फेरी झाली असून, दुसरी फेरी २९ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, त्यावेळेसही राज्यात संचारबंदी असणार आहे. त्यामुळे तेव्हाही मेमू ट्रेनच्या प्रवासी संख्येवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ही मेमू ट्रेन जर रोज चालविली आणि मुंबई मार्गावर चालविली, तर प्रवाशांचा या ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे प्रवाशांमधून सांगण्यात येत आहे.