प्रवाशांनो, स्टेशनावर सामानाच्या ‘ने-आण’साठी आता जादा पैसे द्यावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:47 PM2020-07-18T19:47:21+5:302020-07-18T19:47:31+5:30
जळगाव : रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल बांधवांच्या भाडेवाडीत सोमवारपासून वाढ करण्यात येणार आहेत. यामध्ये लहान स्टेशनपासून ...
जळगाव : रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल बांधवांच्या भाडेवाडीत सोमवारपासून वाढ करण्यात येणार आहेत. यामध्ये लहान स्टेशनपासून ते मोठ्या स्टेशनपर्यंत प्रवाशांना प्रती व्यक्ती एका फेरीसाठी ६० ते ६५ रूपये मोजावे लागणार आहेत.
गाडीतून उतरल्यानंतर स्टेशनबाहेर सामानाची ने-आण करण्यासाठी किंवा स्टेशनामध्ये सामान नेण्यासाठी प्रवाशांना तेथील हमाल बांधवांची मदत घ्यावी लागते. रेल्वेच्या नियमानुसार योग्य ते भाडे घेऊन हमाल बांधव सामानाची ने-आण करित असतात. दरम्यान, वाढत्या महागाईनुसार या भाडेवाढीमध्ये वाढ करण्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून हमाल बांधवाची मागणी सुरू होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून, २० जुलैपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
ही भाडेवाढ करतांना रेल्वे प्रशासनाने मोठे स्टेशन, मध्यम व लहान स्टेशन या नुसार भाडेवाढीचे दर लागू केले आहेत.
यामध्ये भुसावळ, जळगाव व चाळीसगाव स्टेशनवरून सामानाची ने-आण करतांना प्रती प्रवासी ४० किलो वजनापर्यंत ६५ रूपये मोजावे लागणार आहेत. मध्यम स्टेशन असलेल्या पाचोरा, रावेर व धुळे स्टेशनवर प्रती प्रवासी ४० किलो वजनापर्यंत ६० रूपये आकारण्यात येणार आहेत. तर लहान स्टेशनवरूनही ४० किलो वजनापर्यंत ५५ रूपये आकारण्यात येणार आहेत.
तसेच स्टेशनामध्ये दुचाची किंवा चारचाकी नेण्यासाठी १०६ रूपये भाडे आकारण्यात येणार असून, दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्तींना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरने ने-आण करण्यासाठींही भाडे आकारण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.