तत्त्वज्ञानाने पूर्वी पोटं भरत, आता....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:41 PM2019-03-13T14:41:17+5:302019-03-13T14:41:36+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत गाव कट्टा या सदरात लिहिताहेत शिरपूर, जि.धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल...
भारतीय जीवन आजपावेतो तत्त्वज्ञानाधारित असे राहिले. विविध देशी, पाश्चात्य राजवटी येऊनही तत्त्वज्ञानाचा पदर आपण सोडला नाही. तत्त्वज्ञानातील एखादा विचार, वाक्य, भाष्य मानवाला धीर देते, उत्साह देते म्हणूनही तत्त्वज्ञानाशी फारकत आपण घेतली नाही.
आता दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धकालीन म्हणजेच जागतिकीकरणापासून मुक्ती मिळविण्याप्रसंगी तत्त्वज्ञानावरच्या विश्वास उडू लागला आहे. जागतिकीकरणाचा हा मोठा फटका होय. मोक्षासाठी जीवन, संयम ही प्रगतीची किल्ली, ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकले, सत्याचाच कस पाहिला जातो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, यासारखी वाक्ये प्रमाण मानून लोक आपले आयुष्य जगत. अन्यायप्रसंगी तत्त्वज्ञानाची ओळ आठवून आतला राग, अपमान गिळत. वरच्या कोर्टात न्याय मिळतो यावर भरवसा ठेवत.
एखादी गोष्ट मिळाली नाही तरी पुन्हा कधीतरी ती मिळेलच असे मानून पुन्हा कार्यमग्न होत.
आता मात्र जनमानस इंस्टट झाले आहे. आता संयमच बाळगला जात नाही. एखादी मनोवांछित गोष्ट झाली नाही अशाप्रसंगी समजा आपण एखादा तत्त्वज्ञानाचा डोस पाजला. कावळा सिंहासनावर बसला म्हणून राजहंस होत नाही, तर तत्त्वज्ञानाने मनाचे समाधान करून घेण्यापेक्षा आताचे जनमाणस लगेच म्हणते राजसिंहासन मिळाले हे महत्त्वाचे. जे हवे आहे ते मिळेपर्यंत वाट पाहण्याची आता तयारी नाही. प्रत्येकाला घाई आहे. थेंबे थेंबे तळे साचे या तत्वज्ञानावरची श्रद्धा उडालेला माणूस लगेच म्हणेल, तळे साचेपर्यंत आम्ही जिवंत राहू का?
खरे सौंदर्य अंतरंगाचे असते हे तत्त्वज्ञानही आता पटणार नाही. ब्युटी उद्योगाच्या या जमान्यात अहो चेहरे पाहून पदे, पुरस्कार मिळतात. अंतरंगात ढुंकायला कुणाला वेळ आहे, असे उत्तर येण्याची टक्केवारीच जास्त भरेल.
उद्याच्या पुरणपोळीपेक्षा आजची भाकर महत्त्वाची या तत्त्वविचाराचे तर नव्या पिढींसमोर नावच काढू नका. त्यांना उद्याची शाश्वतीच नाही. मग ते नश्वरतेचे, क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे अनेक दाखले देऊन तत्त्वज्ञानाच्या तोंडचे पाणी पळवतील.
जे चकाकते ते सोने नसते हा तत्त्वज्ञान विचार आता मान्य होण्यासारखा नाही. कारण चकाकणाऱ्या वस्तुलाच सोने मानण्याची परंपरा जन्मास घालण्यात आली आहे. एखादा वसंत बहरून येण्यासाठी एखादा शिशीर झडावा लागतो. बीज स्वत:ला जमिनीत गाडून घेते तेव्हाच त्याचे अंकुरात व पुढे वृक्षात रूपांतर होते, अशी तत्त्वज्ञानाची वाक्ये फक्त सभेत टाळ्या घेण्यासाठी असतात. यावर सांप्रत पिढीचा ठाम विश्वास आहे. आपण ऐहिक जगात आहोत हेच खरे आपण गेल्यावर आपला उदोउदो काय कामाचा? जे हवंय ते आता इथेच मिळायला हवे. कीर्ती मागे उरावी किंवा मानवी जीवनाचा ध्यास मोक्ष प्राप्ती असावा हे तत्त्वज्ञान तर चंगळवादी ऐहिकतावादी लोकांच्या पचनीच पडावयाचे नाही. जगातील सर्वात चांगला सुगंध घामाला असतो, असे म्हणणारा आणि मानणारा माणूस थेट तेराव्या शतकातून आलाय की काय असे वाटण्याचा संभव आहे.
संत तुकारामाचा संदेश- चणे खावे लोखडांचे किंवा आधी जग बोलणे सोसावे वगैरेसुद्धा आजच्या शॉर्ट टेम्पर्ड पिढीला पटणार नाही. येथे ब्रह्मपद कुणाला हवेय, काय डोंबलाचं ते ब्रह्मपद? आम्ही का म्हणून कुणाचे ऐकून घ्यावे, असा पवित्रा येथे घेतला जाईल.
मी- माझे या दोन बिंदू पलीकडे माझी त्रिज्या नाही. माझे पोट भरले की मला बाकी काही आस्थेचे वाटणार नाही, असग उत्तर आधुनिक मानसिकतेच्या सांप्रत काळात तत्वज्ञानाने आपला बाडबिस्तरा आवरलेलाच बरा !
संत काव्यानंतर अवतरलेल्या तंत कवितेने ‘दो दिसाची तनू ही साची । सुरत रसाची करूनी मजा’ हा चंगळप्रधान विचार डफ, तुणतुण्याच्या साथीने, तोंडातल्या तंबोºयासह, मनगटावरील गजरे हुंगत पेश केला. अशा वासनाळ लोकांसमोर ‘तनसे तनका मीलन हो न पाया तो क्या मन से मनका मिलन कम तो नही’ हा तत्त्वज्ञानाचा विचार तग धरेल असे दिवस आता राहिले नाहीत.
म.गांधींनी दिलेला अहिंसा- आत्मक्लेश अपरिगृह हा विचार रूचणारा नाही. खरे तर या विचारांनीच भारताची महती जगासमोर अधोरेखित केली. या आत्मक्लेशाने दुसºयाचे अंतकरण द्रवेल यावर नव्या पिढीचा विश्वास नाही. मूळात शरीर बळ, धनबळ, चातुर्यबळ या साधनांनीच हवे ते मिळविता येते अशा ठाम धारणा झालेल्यांसमोर तत्त्वज्ञानाचे कारंजे दुर्लक्षित राहण्याची शक्यताच जास्त.
सन्माननीय अपवाद वगळता कठोर परिश्रमांती लाभणाºया फळाची खात्री नसणे. पैशाने सगळे काही मिळविता येते हे गृहित धरणे, अशा विचारांचेच लोक दिसतात.
प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे तर शुद्ध थोतांडच ठरविले जाण्याची शक्यता आहे. वशिलेबाजीने किंवा अन्य क्लुप्त्या योजून जर फलप्राप्ती होत असेल तर प्रयत्नांचा घाम का उगाच गाळत बसावा हा विचार रूजू लागलाय. कष्टाचे डोंगर उपसल्याशिवाय यशाचा चंद्र दिसत नाही. यासारखी सुभाषिते शालेय भिंतीवरच शोभून दिसतात. प्रत्यक्ष आचरणात मात्र कष्टाशिवाय यश हवे आहे, असे चित्र आताशा दिसू लागले आहे. अशा गैरमार्गाने मोठे झालेले लोक हेच आदर्श मानण्याची घातक परंपरा रूजू पाहतेय. गोरागोमटा अन् कपाळ करंटा ही म्हण समाजव्यवहारात प्रचलित आहे. याचा लक्ष्यार्थ असा की दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे. बाह्य सांैदर्यापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे. लग्नाच्या बाजारात आजही बहुतांश वधू-वर दिसण्याला महत्त्व देतात. कस्तुरीचे रुप अति हिनवर । माजी असे सार मोल तया ’ ही संत तुकारामाची उक्ती अंतरंगाला महत्त्व देणारी व तत्त्वज्ञानपर अशी आहे. तथापि, बाह्यरु पाला नांदावणारी तरूणाई हे कितपत ऐकेल? निंदकाचे घर शेजारी नको आहे. लोखंडाचे चणे न खाता ब्रह्मपदी नियुक्ती हवी आहे.
ऐहिक सुखाच्या मागे धावणाºया आजच्या वर्तमानाने तत्त्वज्ञान हे असे खुंटीवर टांगले आहे. दुसºयासाठी झिजावे, दु:खिताचे अश्रू पुसावेत. अनाथांचे नाथ व्हावे हे सर्व केराच्या टोपलीत टाकून सांप्रत जनमानस कोणत्या पंढरपूरला जाणार आहे. त्याचे ध्येय काय? त्याची ध्येय सिद्धीची साधने कोणती? हे तर न विचारलेलेच बरे.
श्रेय न लाटणे, अपकीर्तीचे भय बाळगणे, आपली रेघ मोठी करण्यासाठी दुसºयाची रेघ न छाटणे ही सुभाषिते पायदळी तुडवीत वाटचाल सुरू आहे. यात आता वैषम्य वाटून घेतले जात नाही इतके समाजमाणस आता बदलले आहे. दर्जा आणि संख्या याबाबतीतही संख्येकडे कल वाढतो आहे. गुणवत्ता की स्वार्थ याबाबतीतही स्वार्थ सिद्धीला महत्त्व दिले जातेय. गुणवंत माणसे कुणालाच चालत नाही. हा नवाच सुविचार अंगवळणी पडतो आहे. संतांनी लाख वेळा सांगून ही आपण बाह्यांगालाच भुलतो आहोत. कीर्तनाने बटाटे कीर्तनातच ठेऊन तत्त्वे गुंडाळत मानवाची वाटचाल सुरू आहे. तत्त्वज्ञानाच्या फुंकरीने राग-क्षोम-नैराश्य शमले जाण्याचा काळ खूप मागे सोडून आपण पुढे आलो आहोत. एखादा कळवल्याचा मित्र काही तत्त्वापदेश करू लागला की, तुझं कीर्तन बंद कर’ अशी बोळवण तर सहजच घेतली जाते. आपलं जगणं हे असं दिशाहीन स्वैर, संयमशून्य स्वरुपाचे झाले आहे. तत्त्वज्ञानाचे लगाम आता प्रभावशून्य झाले आहेत.
मानव आणि पशु यातील तत्त्वज्ञान अपरिहार्यतेची सीमारेषा पुसून टाकून आपले वेगाने पशुकरण होत चालले आहे. सांप्रत काळातील घटना याच पशुत्वावर शिक्कामोर्तब करणाºया आहेत.
तत्त्वज्ञानाचा आग्रह हा मानवी कल्याणासाठीच आहे. तत्त्वज्ञानाचा आणि आंधळ्या अध्यात्माचा संबंध नाही. तत्त्वज्ञान हे शेवटी जीवनशास्त्र आहे. या अंगाने तत्त्वज्ञानाची रुजवणूक मानवी जीवनात आपण वेळीच करू शकलो नाहीत तर मानवातल्या राक्षसांचे युग सुरू व्हायला वेळ लागणार नाही.
-प्रा.डॉ.फुला बागुल, शिरपूर, जि.धुळे
मोबाईल ९४२० ६० ५२०८