पाटणादेवी : खान्देशातील जागृत वरदहस्त शक्तीपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:10 PM2017-09-21T13:10:21+5:302017-09-21T13:13:45+5:30
महाराष्ट्रातील मोठे मंदिर
जिजाबराव वाघ / ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव दि. 19 - शारदीय नवरात्रोत्सव व वासंतिक यात्रोत्सवात आदिशक्तिचा जागर करताना भक्तिभावाचा जणू मोगराच फुलून येतो. नवरात्रीचे पर्व आणि शक्तिपिठांचे स्थान महात्म्य, भाविकांची होणारी अलोट गर्दी हा उत्साही दरवळही ओंसाडून वाहत असतो. खान्देशातील जागृत वरदहस्त शक्तिपीठ म्हणून पाटण्याच्या चंडीका भगवतीची राज्यभर ख्याती आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. आद्य गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची तपोभूमी, प्रेक्षणीय पुरातन ऐतिहासिक स्थळे, असे भक्ती आणि पर्यटनाचे साज असल्याने या क्षेत्राचे सौदर्य अधिक खुलले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवजरून हजेरी लावतात.
श्री संत जर्नादन चरीत्रामध्ये उल्लेख
1128 मध्ये पाटणादेवीचे मंदिर उभारले गेले. त्यांचे लोभस रुपडे हेमाडपंथीय काळाची साक्ष देते. देवगिरीचे मांडलिक राजे यादवराव खेऊनचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी 1150 मध्ये मंदिराचे लोकार्पण केले. खान्देशात पुराणकाळापासून पाटणा (विज्जलगड) स्थळाला महत्व होते. पर्वतराजींवर असणारी दूर्मिळ वनौषधी, खाणी यामुळे या क्षेत्राला र कला, देवस्थान, व्यापार अशी समृद्धता लाभली होती.
वरदहस्त शक्तिपीठाची अख्यायिका
माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारादमुनींच्या सूचनेवरुन माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वत:च्या शरिरातील प्राण काढून घेते. तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात. तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करुन चंडीकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरुन खाली यावे. अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवातीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर माझी स्वयंभु मुर्ती तुज्या हातात येईल. असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे.
कुलस्वामिनी आणि कुळाचार
भगवतीचे मुखमंडल कमालीचे तेजस्वी आहे. अनेक हिंदू जाती-जमातींची भगवती कुलस्वामिनी असून मनोभावे भाविक सर्व कुळाचार करतात. बहुतांशी भाविक आदिशक्तीचे स्मरण करुन धवलतीथार्तुन तांदळा घेऊन हसातमुखाने माघारी फिरतात. पौर्णिमेस महापुजा केली जाते. शारदीय नवारात्रोत्सव व वासंतिक यात्रोत्सव साजरे केले जातात.
महाराष्ट्रातील मोठे मंदिर
आदिशक्तिचे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वेभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याल 28 कोपरे आहेत. 75 बाय 36 फूट मंदिराची लांबी-रुंदी तर 18 फूट उंची आहे. गाभा-यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक येतात. मनोभावे नवस करतात. त्यामुळे नवस फेडणा-या भक्तांचीही गर्दी होते. कुलस्वामिनी म्हणूनही देवीचे महात्म्य आहे. कुळाचार पाळणारे भाविक नवरात्रोत्सवात पुजाही करतात. परराज्यातूनदेखील भाविक येतात.
- बाळकृष्ण जोशी, व्यवस्थापक, पाटणादेवी मंदीर.