पथराड बनतंय कांदा उत्पादकांचे गाव
By Admin | Published: May 16, 2017 01:18 PM2017-05-16T13:18:20+5:302017-05-16T13:18:20+5:30
कांदा लागवडीसाठी एकरी तीने ते चार हजार एवढा मजूरी व बियाणे खर्च येतो.
भगवान मराठे / ऑनलाइन लोकमत
पथराड, जि. जळगाव, दि. 16 - कांदा लागवडीसाठी आधी कांदा बी तयार करावे लागते. कांदा रोप साधारण दीड महिन्याचे झाल्यावर लागवड केली जाते. कांदा लागवडीसाठी एकरी तीने ते चार हजार एवढा मजूरी व बियाणे खर्च येतो. मशागतीसाठी एकरी 1900 ते 2000 खर्च येतो. कांदा लागवड झाल्यानंतर एक वेळा 4 ते 5 हजार रुपयांचे रासायनिक खत दिले जाते. काही शेतकरी दोन ते तीन वेळा रासायनिक खते देतात. यामुळे खर्चात वाढ होते व एकूण खर्च 12 ते 15 हजार प्रती हेक्टरी होतो. रोग निवारणासाठी फवारणी करावी लागते. एकरी 8 ते 10 पंप फवारणी करावी लागते. त्याचा खर्च 2 ते अडीच हजार रुपयांर्पयत येतो. यानंतर तणनाशक फवारणीसाठी एकरी हजार रुपये खर्च येतो. कांदा साधारणत: साडेतीन ते चार महिन्यात तयार होतो. कांदा खांडणीचा खर्च 3800 रुपये येतो. यानंतर कांदा स्वच्छ करून गोण्यांमध्ये भरला जातो. गोण्यांमध्ये कांदा भरण्यासाठी 10 महिला व दोन पुरुष मजूर म्हणून लागल्यास तो एकरी खर्च 2000 रुपये इतका येतो.
कांद्याला या वर्षी भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक:याला लागलेल्या मूल्यापेक्षा कमी मोबदला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला साधारणत: एकरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो आहे.
आज बाजारात कांदा तीन रुपये किलोने विकला जात असल्याने शेतक:याचा कांद्यासाठी झालेला खर्चही निघत नाही, परंतु पुढच्या आशेने शेतकरी कांदा बी तयार करून त्याची साठवण करीत आहेत. त्यामुळे गावाची वाटचाल कांदा उत्पादक गाव अशी होऊ लागली आहे.
70 ते 80 शेतकरी करतात लागवड
पथराड, ता. धरणगाव येथील शेतकरी गेल्या काही वर्षापासून कांदा लागवडीवर भर देत आहेत. आता गावातील 70 ते 75 टक्के शेतकरी कांदा लागवड करायला लागले आहेत़ त्यामुळे गावाची ओळख आता कांदा उत्पादक गाव म्हणून होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पथराड गावातील बहुतेक शेतकरी कांद्याचे बी स्वत: च्याच शेतात घेतात़