वेळेवर इंजेक्शन न दिल्याने गणपती हाॅस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:20+5:302021-05-08T04:17:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील गणपती हाॅस्पिटलमध्ये एका ३९ वर्षीय तरुणासाठी इंजेक्शन आणूनही ते वेळेवर दिले नाही तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील गणपती हाॅस्पिटलमध्ये एका ३९ वर्षीय तरुणासाठी इंजेक्शन आणूनही ते वेळेवर दिले नाही तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार दौलत नगरातील रहिवासी पंकज कृष्णा बाविस्कर यांना १ मे रोजी गणपती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांनी रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, प्रमुख डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती.
बहिणीचा आक्रोश अन् विनवण्या
पंकज बाविस्कर यांच्या भगिनी काजल बाविस्कर यांनी यावेळी आक्रोश केला. काहीही करा, माझ्या भावाला शॉक द्या, शेवटचे प्रयत्न करा; मात्र त्याला वाचवा अशा विनवण्या त्या यावेळी करीत हाेत्या. आम्ही ५ वाजता इंजेक्शन आणले; मात्र ते दिले गेले नव्हते, इंजेक्शन दिले असते तर भाऊ बचावला असता असा आक्रोश यावेळी त्यांनी केला. आरएमओच्या चुकीमुळे भाऊ गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
महापौरांची रुग्णालयात भेट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन महापौरांनी नातेवाईकांना दिले. यावेळी डॉ. ललित पाटील यांनी उपमहापौरांना माहिती दिली. पंकज बाविस्कर हे २६ रोजी बाधित आल्यानंतर त्यांना सुरुवातीला इकराला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना १ मे रोजी गणपती हाॅस्पिटलला दाखल केले. त्यांची ऑक्सिजन पातळी ८८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अमर जैन यांची उपस्थिती होती, त्यांनीही नातेवाईकांची समजूत काढली.
डॉक्टरांचे खच्चीकरण : लीना पाटील
डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले, डॉक्टर खूप तणावात काम करीत आहेत. मृत्यू हे विषाणूमुळे होत आहेत, डॉक्टरांमुळे नाही, तुमचा डॉक्टरांवर विश्वास राहिलेला नाहीय, यामुळे डॉक्टरांचे अशा परिस्थितीत खच्चीकरण होतेय, असे डॉ.लीना पाटील यावेळी म्हणाल्या. डॉक्टर देव नसतात, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोट
रुग्ण आधी इकरा सेंटरला दाखल होते. तेथे पाच ते सहा दिवस राहिल्यानंतर गंभीरावस्थेत दाखल करण्यात आले. आम्ही नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली होती. रुग्णाच्या उपचारात कुठलाच निष्काळजीपणा झालेला नाही. टास्कफोर्सचे डॉक्टर स्वत: या ठिकाणी काम करत आहेत. रुग्ण दोन दिवसांपासून व्हेंटिलेटवर होता. उपचारात हलगर्जीपणा झालेला नाही, सर्वत्रच गंभीर परिस्थिती आहे.
- डॉ. शीतल ओसवाल, गणपती हाॅस्पिटल.