बाधित असूनही डॉक्टरकडून रुग्ण तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:03 PM2020-07-02T17:03:13+5:302020-07-02T17:04:28+5:30
स्वत: कोरोना बाधित असतानाही रुग्णांची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरने २२ जणांना बाधित केल्याची माहिती समोर येत आहे.
बोदवड, जि.जळगाव : स्वत: कोरोना बाधित असतानाही रुग्णांची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरने २२ जणांना बाधित केल्याची माहिती समोर येत आहे.
या खासगी डॉक्टरविरुद्ध बोदवड पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड शहरातील नाडगाव रस्त्यावर राहणारा ४१ वर्षीय खासगी डॉक्टर २५ जूनला करंजी येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता. यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले.
ग्रामीण भागात जावून ते वैद्यकीय सेवा देतात. या दरम्यान त्यांना अहवाल येईपर्यंत होम क्वॉरंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी नियमांचे उल्लंघन करीत बोदवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील नाडगाव येथे तसेच १० किलोमीटर अंतरावरील शेलवड येथे जावून काही रुग्णांची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे. २७ व २८ रोजी त्यांनी ही तपासणी केली. या दरम्यान या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णांनाही बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
होम क्वॉरंटाईन होण्याच्या नियमांचे उल्लंघन करून रुग्णांची तपासणी केली. यातून रुग्णांनाही कोरोनाची बाधा झाली. यामुळे तहसीलदार हेमंत पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांना या डॉक्टरविरुद्ध फिर्याद देण्याचे आदेश दिले. त्यावरून आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, महाराष्टÑ कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या डॉक्टरच्या कुटुंबातील सहा जणांना जळगावी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच शेलवड येथील १६ रुग्णांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. यांनाही जळगावी कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय २० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.