रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.३१ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:25+5:302021-04-21T04:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात चाचण्यांमध्ये बाधित येणाऱ्यांचे प्रमाण मंगळवारी घटले असून चाचण्या वाढल्या तरी रुग्णसंख्या स्थिर असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात चाचण्यांमध्ये बाधित येणाऱ्यांचे प्रमाण मंगळवारी घटले असून चाचण्या वाढल्या तरी रुग्णसंख्या स्थिर असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. यात शहरात नव्या १७१ रुग्णांची नोंद करण्यात आली असून २६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी सारी, कोविड संशयित अशा १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आता पॉझिटिव्हिटी घटल्याने एक दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मंगळवारी विक्रमी १७ हजारांवर चाचण्या करण्यात आल्या. यात अँटिजेनचे प्रमाण अधिक असून केवळ पाच टक्के बाधित रुग्ण यात आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरचे १९७५ अहवाल समोर आले, यात २८६ बाधित आढळून आले आहेत.
मृत्युदर सोडला तर जिल्हा ग्रीन
नाशिक विभागातील जिल्ह्यांच्या कोरोनाबाबतीतील आठवड्याचा अहवाल आरोग्य विभागाने जाहीर केला असून राज्याच्या तुलनेत केवळ मृत्युदर सोडला तर सर्वच बाबतीत जळगाव जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८६.३१ टक्के असून राज्याचे हे प्रमाण ८०.९२ टक्के आहे. तर पॉझिटिव्हिटी ही १०.९३ टक्के असून राज्याची पॉझिटिव्हिटी ही १६.७४ टक्के आहे. मृत्युदर मात्र राज्यापेक्षा जिल्ह्याचा थोडा अधिक आहे. जिल्ह्याचा मृत्युदर हा १.६५ टक्के असून राज्याचा मृत्युदर हा १.५८ टक्के आहे. १२ ते १८ एप्रिल दरम्यान ११७ मृत्यू झालेले आहेत. दर दहा लाख लोकसंख्येमागे जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ९५६ लोकांच्या टेस्ट होत आहेत.
पॉझिटिव्हिटी
अँटिजेन : ५ टक्के
आरटीपीसीआर : १४.४८ टक्के
मृत्यू थांबेना
शहरात पुन्हा पाच बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात ७० व ७९ वर्षीय पुरुष, तर ५८, ६०, ८५ वर्षीय महिलांचा समावेश आहे. यासह भुसावळ, पाचोरा, यावल तालुक्यात प्रत्येकी ३, एरंडोल, रावेर तालुक्यात प्रत्येकी २, जळगाव, जामनेर व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.