नातेवाईकांकडूनच सुरु होती रुग्णांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:52 AM2020-06-20T11:52:51+5:302020-06-20T11:53:12+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड : नातेवाईकाला बाहेर काढत रुग्णालय प्रशासनाला विचारला जाब
जळगाव : कोविड रुग्णालयात नातेवाईकांकडूनच रुग्णांची सेवा होत असल्याचा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच पाहणीत समोर आला़ नातेवाईकांना का सेवा करावी लागतेय? नातेवाईक थेट रुग्णालयात कसे येतात? असा जाब त्यांनी अधिष्ठातांसह डॉक्टर्सना विचारला व वडिलांची सेवा करीत असलेल्या तरूणाला विचारपूस करून कक्षाच्या बाहेर जाण्यास सांगितले़
जिल्हाधिकारी राऊत यांनी शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयात जवळपास सर्वच कक्षात पाहणी केली़ सुमारे सव्वा तास त्यांनी सर्व कक्ष पिंजून काढत सर्वांची सविस्तर माहिती घेतली़ यानंतर त्यांनी पंधरा मिनिटे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यालयात बैठकही घेतली़ यावेळी प्रशासक डॉ़ बी़ एऩ पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार, डॉ़ मारूती पोटे, डॉ़ मधुकर गायकवाड, नोडल अधिकारी डी़ आऱ लोखंडे, अधिसेविका सविता अग्निहोत्री आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी राऊत यांनी सुरूवातीलाच कक्ष एक मध्ये भेट दिली़ या ठिकाणी मस्टर तपासले, सीसीटीव्हीबाबत विचारणा केली़ ते पाहणी करीत असताना रुग्ण ताटकळले होते़ स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली़ महिलेचा मृत्यू झालेल्या जागेवरही त्यांनी पाहणी केली़
अधिष्ठतांच्या कार्यालयात घेतला आढावा
जिल्हाधिकाºयांनी अधिष्ठाता कार्यालयात आढावा घेतला़ सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांच्याकडून प्रयोगशाळेसंदर्भात त्यांनी माहिती घेतली़ तपासण्या वाढविण्यासाठी काय करता येईल? तपासण्यांची गती वाढविण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी विचारणा केली़ किमान दोन दिवसात अहवाल आल्यास रुग्णांची गर्दी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले़
पोलीस फोर्स नेमा, मात्र नातेवाईक येता कामा नये
कक्ष दहा मध्ये पाहणी करीत असताना संशयित रुग्ण असलेल्या आपल्या वडिलांना एक तरूण जेवण भरवत होता़ जिल्हाधिकारी राऊत यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी याबाबत विचारणा केली़ त्यावेळी सर्वच अवाक् झाले़ त्यांनी तातडीने त्या तरूणाला बोलावून विचारपूस केली व रुग्णालय प्रशासनावर काहीशी नाराजीही व्यक्त केली़ नातेवाईक येतील, बाहेर जातील व बाहेर अधिक संसर्ग वाढेल़ त्यामुळे पोलीस आणा, मात्र नातेवाईक आत येता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या़ सुरक्षा यंत्रणा कशी याबाबतही त्यांनी माहिती घेतली़ अन्य रुग्णांशीही त्यांनी सवाद साधला़
रुग्णवाहिका नसल्याने रुग्ण हलविता येईना
कोविड रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण येत असल्याने ताण वाढला आहे़ अशा स्थितीत कक्ष १३मधील २२ बाधित रुग्ण हे गोदावरी रुग्णालयात हलवायचे आहेत. मात्र, डॉक्टर्स व रुग्णवाहिकाच नसल्याने हा विषय प्रलंबित असल्याची माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली़ हा कक्ष मोकळा झाल्यास या ठिकाणी संशयितांना ठेवता येईल, असे या डॉक्टरांनी सुचविले़