रुग्णाला दिली जाते कैद्याप्रमाणे वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:40 PM2020-07-02T12:40:25+5:302020-07-02T12:41:29+5:30
कोविड रुग्णालयातील गंभीर प्रकार : २४ तासात महिलेवर उपचारच नाही
जळगाव : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोरोना रुग्णालयात रुग्णांची अवहेलना व हेळसांड सुरुच असून कैद्यांप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात असल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाच्या या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गंभीर व आॅक्सिजन लावलेल्या रुग्णांना देखील स्वत: उठून डॉक्टरांच्या टेबलकडे जावून औषधी व गरम पाणी घ्यावे लागत असल्याने संतापात आणखीनच भर पडली आहे.
रुग्णालयातून सुटका झालेल्या एका वृध्द महिलेच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ ला दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यांनी हा प्रकार डोळ्यांनीही बघितला व रुग्णानेही त्यांच्याकडे कथन केले. ६० वर्षीय या महिलेला कोविड रुग्णालयात २५ रोजी दाखल करण्यात आले. २८ रोजी सायंकाळी या रुग्णाला नातेवाईकांना कोणतीही पूर्वसूचना न देता घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णाची नवीन चाचणी घेण्यात आली नाही, त्यामुळे हा रुग्ण पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह हे कळायला मार्ग नाही. तशाच परिस्थितीत सुटका करण्यात आली. या चार दिवसाच्या काळात पहिल्या २४ तासात तर कोणतेही उपचार या रुग्णावर झाले नाहीत. डॉक्टर, परिचारिका यांच्याकडे खेटा मारल्यानंतर कुठे उपचाराला सुरुवात झाली. ही वृध्दा अतिशय गंभीर होती. पोटात अन्नाचा कण नाही, त्यामुळे प्रचंड अशक्तपणा आलेला. तोंडातून शब्दही निघणे अवघड असताना त्यांना देखील जागेवर गरम पाणी व औषधी मिळाली नाही. या वॉर्डात मध्यभागी एक टेबल ठेवलेला असून त्यावर गरम पाणी व औषधी ठेवण्यात येते. परिचारिका किंवा परिचर ह्या कारागृहात कैद्यांना ज्या पध्दतीने आवाज देऊन बोलावले जाते, त्याच पध्दतीने रुग्ण क्रमांक अमूक असे नाव पुकारुन बोलावले जाते व टेबलावरील औषधी स्वत: ला घ्यावी लागते. डॉक्टर, परिचारिका व परिचर रुग्णाजवळ जावून उपचार करण्याची तसदी घेत नसल्याचे या रुग्णाने सांगितले.
दांडगा वशिला असला तरच काम
या रुग्णालयात दांडगा वशिला असला तरच रुग्णाला उपचार मिळतात, किंवा त्यांना अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णालयात पाठविले जाते. अन्यथा सामान्य रुग्णाने तर स्वप्नही पाहू नये अशी अवस्था आहे. दुसरी बाजू या रुग्णाने अशीही सांगितली की, गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचेच रुग्ण हाताळले जात असल्याने डॉक्टर व इतर स्टाफ कंटाळला आहे. काम करणारे डॉक्टर, कर्मचारी बिचारे जीवाची पर्वा न करता पुण्य समजून सेवा देत आहेत, आणि दिखावा करणारे दिखावाच करीत आहेत, त्यामुळे देखील नाराजीचा सूर आहे.
राज्यभर बदनामी, तरीही सुधारणा नाही !
जिल्हा कोरोना रुग्णालयातून वृध्द महिला बेपत्ता होणे व नंतर तिचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून येणे, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या डॉक्टरांनी ढुंकून न पाहणे यामुळे रुग्णालया व जळगावाची राज्यभर बदनामी झाली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा यात बळीचा बकरा बनविण्यात आल्याची चर्चा आहे.