रुग्णांना मिळतोय दुजाभावाचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:25 PM2020-08-12T12:25:13+5:302020-08-12T12:25:19+5:30
जळगाव : शासकीय अभियांत्रिकी ्महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना गेल्या चार दिवसात दोन वेळा निकृष्ठ जेवण दिल्याचा प्रकार ...
जळगाव : शासकीय अभियांत्रिकी ्महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना गेल्या चार दिवसात दोन वेळा निकृष्ठ जेवण दिल्याचा प्रकार घडल्यानंतर, या प्रकाराचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. मक्तेदारातर्फे रायसोनी अभियांत्रिकीमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येत असून, शासकीय अभियांत्रिकीमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण का, असा प्रश्न सोमवारच्या घटनेनंतर संतप्त रुग्णांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकारावर मनपा प्रशासनाचे नियंत्रण नाही का, असा प्रश्नही रुग्णांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये सोमवारी दुपारी भातामध्ये चक्क अळ््या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे कोविड सेंटरमधील जेवणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर त्या भातामधील निघालेल्या अळीचे फोटो व्हायरल होऊन, या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी कोरोना सेंटर असून या ठिकाणी रेडक्रॉसने मक्ता सोडल्यानंतर दिनेश टाटीया यांच्याकडून जेवण देण्यात येत आहे.
इतर ठिकाणच्या कोरोना सेंटरमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. निकृष्ठ जेवणाबद्दल चार महिन्यात एकही तक्रार नाही. मात्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये निकृष्ठ जेवणाच्या तिन वेळा तक्रारी करण्यात आल्या. या प्रकाराबद्दल रुग्णांतर्फे मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून मक्तेदाराला मनपा प्रशासनच अभय देत असल्याचा आरोपही रुग्णांमधून करण्यात येत आहे.
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातीस जी. एम. फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरमध्ये दोन्ही वेळचे जेवण व नाष्टा उत्तम प्रकारे देण्यात येत आहे. जेवणाबद्दल कुणाच्याही तक्रारी नाहीत. मनपा प्रशासनाने आम्हाला सांगितल्यावर आमच्या मक्तेदारामार्फत आम्ही त्या ठिकाणी चांगले जेवण देण्याचा प्रयत्न करू.
-नंदू अडवाणी, जी. एम. फाउंडेशन मित्र परिवार.
अद्यापही भोजनाच्या ठेक्यावर निर्णय नाही
मनपाने कोविड सेंटरमध्ये भोजन पुरविण्यासंदर्भात पाच मक्तेदारांनी प्रस्ताव पाठविले आहेत. मनपा प्रशासनातर्फे या प्रस्तावर संबंधित मक्तेदारांशी चर्चादेखील करण्यात आली. मात्र, अद्यापही ठेका देण्यासंदर्भात मनपा प्रशासनातर्फे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. शक्य झाल्यास बुधवारी या निर्णय होणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
शासकीय अभियांत्रिकीमध्ये जेवण पुरविण्याचा ठेका माझ्याकडे नसून, तेथील ठेकेदाराला केवळ स्वयंपाकासाठी आचारी पुरविले आहेत. भातामध्ये अळी कशी निघाली, हे मी सांगू शकत नाही.
-दिनेश टाटीया, मक्तेदार.